लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई: अवघड समजली जाणारी अवयवदान शस्त्रक्रिया मुंबईमध्ये नुकतीच पूर्णपणे रोबोटिक पद्धतीने करण्यात डॉक्टरांना यश आले. एका ४० वर्षीय महिलेवर रोबोटिक पद्धतीने यकृत दान शस्त्रक्रिया करण्यात आली.

मुंबईतील जसलोक रुग्णालयात सुजाता साहू (४०) यांच्यावर रोबोटिक यकृत दान शस्त्रक्रिया करण्यात आली असून ऑटोइम्युन संबंधित सिरॉसिस आणि यकृताच्या कर्करोगाने त्रस्त असलेले त्यांचे ६९ वर्षांचे वडील पंचानन पात्रा यांना जीवनदान देणारी यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात डॉक्टरांना यश आले आहे. प्रत्यारोपणापूर्वी सुजाता आपल्या वडिलांना स्वत:च्या यकृताचा एक भाग दान करून त्यांचा जीव वाचवण्यासाठी उत्सुक होत्या. मात्र, शस्त्रक्रियेमुळे पोटावर होणारी जखम आणि वेदनेला त्या घाबरत होत्या. याच कारणामुळे अनेक दाते अवयव दान करायला पुढे येत नाहीत. त्यामुळे डॉक्टरांनी रोबोटिक पद्धतीने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. रोबोटिक शस्त्रक्रियेमुळे पोटावर मोठी जखम होत नाही आणि वेदनाही कमी होतात.

आणखी वाचा- मद्यधुंद तरूणाने केली बेस्ट बसची तोडफोड, बसचालक आणि पोलिसाला मारहाण

रोबोटिक उपकरणांच्या साहाय्याने पोटामध्ये ८ ते १० मिमीची छिद्रे करून दात्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. दात्याच्या यकृताचा भाग काढण्यासाठी तयार झाल्यानंतर डॉक्टरांनी उदराखालील भागावरील हाडावर ९ सेंमीची चीर देऊन त्यातून ते बाहेर काढले. नेहमीच्या शस्त्रक्रियेच्या तुलनेत ही चीर खूपच लहान होती. ही शस्त्रक्रिया करताना कोणताही स्नायू कापण्यात आला नाही, अशी माहिती ज्येष्ठ रोबोटिक प्रत्यारोपण शल्यचिकित्सक डॉ. कमल यादव यांनी दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रूग्णाचे पूर्णपणे रोगग्रस्त यकृत काढणे आणि रोबोटिक पद्धतीने काढलेले अर्धे यकृत बसविण्याची शस्त्रक्रिया, तसेच दात्याचे यकृत काढण्याची शस्त्रक्रिया या सर्व प्रक्रियेसाठी साधारण ९ तास लागले. सुजाता यांना ६ दिवसांत तर तिच्या वडिलांना प्रत्यारोपणानंतर १२ दिवसांनी घरी पाठविण्यात आले. डॉ. ए. एस. सोईन, डॉ. कमल यादव, डॉ. अमित रस्तोगी आणि डॉ. प्रवीण अगरवाल यांनी ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडली.