रिपब्लिकन मेळाव्यात मुख्यमंत्र्यांची गर्जना
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांनी दाखविलेला मार्ग आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानावर अढळ श्रद्धा ठेवून गेल्या पाच वर्षांत राज्य सरकारने समाजातील शेवटच्या माणसाच्या कल्याणासाठी काम केले आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा भाजप-शिवसेना-रिपब्लिकन-रासप महायुतीचीच सत्ता येणार, आता आम्हा कोणी रोखू शकणार नाही, अशी गर्जना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी रिपब्लिकन पक्ष कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात केली.
रिपब्लिकन पक्षाच्या वतीने वरळी येथील नॅशनल स्पोर्ट क्लबच्या सभागृहात कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता. पक्षाचे अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले हे मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी होते. या वेळी राज्याचे सामाजिक न्याय मंत्री सुरेश खाडे, पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर, सामाजिक न्याय राज्यमंत्री अविनाश महातेकर, खासदार राहुल शेवाळे, रिपब्लिकन पक्षाचे नेते गौतम सोनावणे आदी उपस्थित होते.
केंद्रातील व राज्यातील भाजप सरकारने गेल्या पाच वर्षांत दलित, आदिवासींच्या कल्याणासाठी घेतलेले निर्णय आणि योजनांची माहिती देऊन मुख्यमंत्री म्हणाले की, काँग्रेस सरकारच्या काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी इंदू मिलची जमीन देण्यास टाळाटाळ केली जात होती, परंतु केंद्रात व राज्यात भाजपचे सरकार आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाबासाहेबांच्या स्मारकासाठी इंदू मिलची संपूर्ण जमीन राज्य सरकारच्या ताब्यात देण्याचा निर्णय तीन दिवसांत घेतला. डिसेंबर २०२० पर्यंत बाबासाहेबांचे भव्य स्मारक उभारण्यात येईल, असे त्यांनी जाहीर केले.
मी जातो तेथे सत्ता येते !
मी कायम सत्तेच्या मागे जातो, अशी टीका केली जाते, परंतु मी सत्तेच्या मागे जात नाही, तर मी जेथे जातो, तेथे सत्ता येते, असे आठवले यांनी त्यांच्या टीकाकारांना उत्तर दिले.
भाजप, मोदी आरक्षणविरोधी नाही -आठवले
रामदास आठवले म्हणाले की, भाजप व पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आरक्षणविरोधी नाहीत, परंतु विरोधकांकडून तसा चुकीचा प्रचार केला जातो. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ ही एका जातीची, धर्माची नाही, तर ती संपूर्ण भारतीयांची आहे. गरिबीमुक्त, भ्रष्टाचारमुक्त, विषमतामुक्त भारत बनविण्याचा विचार संविधनातून मांडला आहे, त्या विचारानुसारच सध्याचे सरकार काम करीत आहे, असा दावा त्यांनी केला.