केंद्रात आणि राज्यात सत्तांतर झाल्यानंतर भाजपची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघातही ‘नव-स्वयंसेवकां’ची रीघ सुरू झाली आहे. देशात राजकीय परिवर्तन घडवून आणणाऱ्या पक्षास ताकद देणारी ही संघटना चालते कशी, तिची जडणघडण, कार्यपद्धती आणि वैचारिक बैठकही जाणून घेण्याची उत्सुकता समाजात वाढत असल्याचे स्पष्ट झाल्याने, ‘जॉइन आरएसएस’ नावाची एक मोहीम संघाने सुरू केली आहे. संघ कार्यकर्त्यांनी गेल्या काही महिन्यांपासून मुंबई परिसरात सुमारे ४० ठिकाणी स्वयंसेवक ‘नोंदणी केंद्रे’ सुरू केली असून येत्या ७ जानेवारीस मुंबईसह कोकण प्रांतातील अशा नवागतांसोबत जागोजागी संघ परिचय मेळावे आयोजित करण्यात येणार आहेत.

डहाणूपासून गोव्यापर्यंत पसरलेल्या किनारी भागातील कोकण प्रांतात संघाच्या कामाचा विस्तार व्हावा, नव्या लोकांना संघटनेत जोडून घ्यावे, या उद्देशाने ‘हिंदू चेतना संगम’ या नावाने हे मेळावे आयोजित करण्यात येणार असून सुमारे दीड लाख स्वयंसेवक आणि समाजातील अनेक नामवंत व्यक्ती त्या मेळाव्यांत सहभागी होतील अशी संघाच्या कोकण प्रांत पदाधिकाऱ्यांची अपेक्षा आहे. कोकण प्रांतातील शहर-तालुका स्तरावर २५५ ठिकाणी एकाच वेळी होणाऱ्या या मेळाव्यांतून संघटनेची ताकद समाजासमोर मांडण्याचा संघाचा उद्देश आहे.

गेल्या काही वर्षांत संघाविषयी समाजात मोठय़ा प्रमाणात उत्सुकता निर्माण झाली आहे. देशभर सुरू असलेली सेवाकार्ये तसेच शिक्षण, ग्रामविकास, आरोग्य, रोजगार आणि संस्कार आदी क्षेत्रांतील नियोजनबद्ध कामांमुळे संघाशी परिचित नसलेले अनेक जण संघाच्या कामात सहभागी होण्याची इच्छा व्यक्त करू लागल्याने, सन २०१२ पासून संघाने ‘जॉइन आरएसएस’ ही ऑनलाइन मोहीमही सुरू केली आहे. संघाच्या संकेतस्थळावरून नोंदणी करून संघात सहभागी होण्याचा पर्याय या मोहिमेद्वारे देण्यात आल्याने मोठय़ा प्रमाणात नोंदणीची रीघ लागली आहे, असे कोकण प्रांत सहकार्यवाह विठ्ठल कांबळे यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.

‘जॉइन आरएसएस’ मोहिमेचा भाग व ७ जानेवारीच्या ‘हिंदू चेतना संगम’ची पूर्वतयारी म्हणून, मुंबई परिसरात संघाच्या कार्यकर्त्यांनी अनेक ठिकाणी रस्त्यांवरदेखील नोंदणी केंद्रे उघडली आहेत. या केंद्रांवर नोंदणी अर्ज भरून देणाऱ्याशी त्यांच्या परिसरातील संघ कार्यकर्ते संपर्क साधतील व संघाच्या विविध उपक्रमांचा परिचय, संवाद, माहिती, शंकासमाधान आदी माध्यमांतून नवख्यांचे नाते संघाशी जोडतील. गेल्या काही महिन्यांत बूथ नोंदणी तसेच ऑनलाइन मोहिमेस मोठा प्रतिसाद मिळाला असून दर दोन मिनिटांमागे एक नवी नोंदणी होत असल्याने संघविस्तारास पोषक वातावरण समाजात निर्माण झाले आहे, असा दावा कांबळे यांनी केला.