७ जानेवारीपर्यंत जमावबंदी, मुंबई पोलिसांचे आदेश जारी

मुंबई : नव्या वर्षांचे जल्लोषात स्वागत करण्याचे बेत मुंबईकर आखत असतानाच करोना आणि ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी कलम १४४ अंतर्गत जमावबंदीचे आदेश जारी केले आहेत. परिणामी, नववर्षांच्या पूर्वसंध्येला पार्टी अथवा कार्यक्रमांचे आयोजन करता येणार नाही. शुक्रवार, ७ जानेवारीपर्यंत जमावबंदीचे आदेश लागू राहणार आहेत. उपाहारगृह, बार, पब, रिसॉर्ट, क्लब येथे खुल्या किंवा बंदिस्त जागी ३० डिसेंबर ते ७ जानेवारी या काळात नवीन वर्षांचे स्वागत करण्यासाठी एकत्र जमता येणार नाही. शिवाय गच्चीवर होणाऱ्या पाटर्य़ावरही निर्बंध लागू करण्यात आले आहेत. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कलम १८८ अंतर्गत कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. पोलिसांनी जागोजागी नाकाबंदी केली असून, घोळक्याने फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे.

कोणत्या कायद्यान्वये कारवाई?

३० डिसेंबर २०२१ च्या मध्यरात्री १२ वाजल्यापासून ७ जानेवारीच्या मध्यरात्री १२ वाजेपर्यंत मुंबई पोलीस आयुक्तांच्या अखत्यारीत येणाऱ्या सर्व ठिकाणी हे आदेश लागू असतील, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. या आदेशाचे उल्लंघन करणारी कोणतीही व्यक्ती भारतीय दंड संहिता १८६० च्या कलम १८८ अन्वये शिक्षेस पात्र असेल. 

३० हजारहून अधिक पोलीस तैनात

विशेष बंदोबस्त नववर्षांच्या पूर्वसंध्येला कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मुंबई पोलीस, वाहतूक पोलीस कर्मचारी, राज्य राखीव दल आणि केंद्रीय औद्योगिक बलाचे जवान तैनात करण्यात येणार आहेत. सर्व पोलिसांना साप्ताहिक सुटय़ा घेऊ नये असे सांगण्यात आले असून या दिवशी ३० हजारहून अधिक पोलीस अधिकारी-कर्मचारी तैनात राहणार आहेत. शहरातील विविध रेल्वे स्थानके, महत्त्वाची मंदिरे, तसेच गर्दीच्या ठिकाणी साध्या वेशातील पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांना तैनात करण्यात येणार आहे.

 छेडछाडीवर विशेष लक्ष

छेडछाड अथवा विनयभंगासारख्या घटना घडू नयेत यासाठी ठोस उपाययोजना करण्याचे आदेश प्रत्येक पोलीस ठाण्याला देण्यात आले आहेत. यादरम्यान महिला तसेच लहान मुलांची छेडछाड होणार नाही याकडे पथकांचे लक्ष राहील. तसेच निर्भया पथकांनाही गस्ती वाढवण्याबाबत विशेष आदेश देण्यात आले आहे.

वाहतूक पोलिसांकडून भेटवस्तू

नववर्षांच्या पूर्वसंध्येला मद्यपी चालकांवर कारवाईबरोबरच प्रबोधन करण्याचा निर्णय वाहतूक पोलिसांनी घेतला आहे. मॉल, नाकाबंदीची ठिकाणे, चौपाटी या ठिकाणांवर वाहतूक पोलिसांमार्फत जनजागृतीपर संदेश देण्यात येणार आहेत. तसेच मद्य प्राशन न करता गाडी चालवणाऱ्या चालकांना वाहतूक विभागाचे चिन्ह असलेले किचेन भेट म्हणून देण्यात येणार आहे. तसेच वाहतुकीच्या नियमांचे पालन न करणाऱ्या चालकांना ‘मी वाहतुकीचे नियमाचे पालन करेन’ असा संदेश असलेली मनगटपट्टी (रिस्टबँड) देणार आहेत.

ड्रोनचा वापर

गेट वे ऑफ इंडिया, मरिन ड्राइव्ह, वरळी सी फेस, बॅण्ड स्टॅण्ड, जुहू चौपाटी येथे होणारी गर्दी लक्षात घेऊन बंदोबस्त वाढविण्यात येणार आहे. या ठिकाणी होणाऱ्या गर्दीवर लक्ष ठेवण्यासाठी पोलीस ड्रोनचा वापर करणार असून किनाऱ्यावरील गस्तीसाठी पोलीस स्पीड बोटीचा वापर करणार आहेत. येथे फटाके फोडण्यास मनाई करण्यात आली आहे.

मद्यपी चालकांना १० हजार रुपये दंड

मद्य प्राशन करून गाडी चालवणाऱ्यांमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी वाहतूक पोलीस सज्ज झाले आहेत. ३० डिसेंबरपासून ९० ठिकाणी नाकाबंदी करण्यात येत आहे. नव्या दंडाच्या रकमेनुसार यावर्षी मद्यपी चालकावर १० हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे.

रेल्वे पोलीस सतर्क

रेल्वे स्थानकावरील सुरक्षा वाढविण्यात आली आहे. मुंबईत नुकतीच दहशतवादी संघटनांमार्फत पाहणी करण्यात आल्याची माहिती केंद्रीय यंत्रणांच्या हाती लागली होती. त्या पार्श्वभूमीवर मुंबईतील रेल्वे स्थानकांवर विशेष बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.