माझा छळ आणि अपमानित करण्यात आलं; NIA कोठडीत जबरदस्तीने…; सचिन वाझेंचे गंभीर आरोप

निलंबित सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांनी माजी न्यायामूर्ती चांदीवाल यांच्यासमोर झालेल्या सुनावणीत गंभीर आरोप केले आहेत

Justice KU Chandiwal commission, Anil Deshmukh, Parambir Singh, अनिल देशणुख, परमबीर सिंग, परमबीर सिंह
निलंबित सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांनी माजी न्यायामूर्ती चांदीवाल यांच्यासमोर झालेल्या सुनावणीत गंभीर आरोप केले आहेत

बडतर्फ करण्यात आलेले माजी सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांनी माजी न्यायामूर्ती चांदीवाल यांच्यासमोर झालेल्या सुनावणीत गंभीर आरोप केले आहेत. राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (NIA) कोठडीत असताना आपला छळ करण्यात आला. तसंच अपमानित करत जबरदस्तीने कागदपत्रांवर स्वाक्षरी घेण्यात आली असा आरोप सचिन वाझे यांनी केला आहे. आपण अद्यापही मानसिक धक्क्यात असल्याचं सचिन वाझे यांनी म्हटलं आहे.

माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने मार्च महिन्यात चांदीवाल आयोग गठीत केला होता. मंगळवारी अनिल देशमुखांच्या वकिलांनी उलटतपासणी केली असता सचिन वाझेंनी आपण एनआयए विशेष कोर्टाकडे स्वाक्षरी केलेल्या कागदपत्रांची मागणी केली असून, अद्याप ती मिळाली नसल्याची माहिती दिली.

परमबीर सिंह-सचिन वाझे भेटीवर गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

अनिल देशमुखांच्या वकील अनिता यांनी तुम्ही एनआयए कोठडीत असताना तुम्ही कोणत्या दबावात होतात का? असं विचारण्यात आलं असता सचिन वाझे यांनी म्हटलं की, “हो नक्कीच….ते माझ्या आयुष्यातील सर्वात जास्त मानसिक त्रास देणारे दिवस होते”. पुढे त्यांनी विचारलं की, “त्या काळात अनेक केंद्रीय तपास यंत्रणा तुमचा जबाब नोंदवत होत्या?” यावर उत्तर देताना सचिन वाझेंनी सांगितलं की, “याचं योग्य उत्तर असं आहे की, त्या २८ दिवसांमध्ये एनआय छळ, अपमान आणि मानसिक त्रासासाठी कारणीभूत ठरत होतं”.

सचिन वाझे-परमबीर सिंह भेट ; अनिल देशमुख यांच्या वकीलांची नाराजी

“मी एनआयए कोठडीत होतो तेव्हा मला जबरदस्तीने काही कागदपत्रांवर सह्या करण्यास भाग पाडण्यात आलं. ही कागदपत्रं मला देण्यात आलेली नाहीत. ३ मे रोजी मी विशेष एनआयए कोर्टाकडे ही कागदपत्रं दिली जावीत अशी विनंतीही केली होती,” असं सचिन वाझे यांनी सांगितलं. बुधवारी याप्रकरणी पुन्हा सुनावणी होणार आहे.

चांदीवाल आयोगासमोर हजर होण्यासाठी गेलेल्या परमबीर सिंग यांच्यासमोर आले सचिन वाझे; अन् त्यानंतर…

अनिल देशमुख-सचिन वाझे आयोगासमोर

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग आणि सचिन वाझे यांच्यातील भेटीवरुन गोंधळ उडाला आहे. त्यातच मंगळवारी वाझे आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट झाली. माजी न्यायामूर्ती चांदीवाल यांच्यासमोर मंगळवारी सुनावणी होती. या सुनावणीसाठी सचिन वाझे आणि अनिल देशमुख आले होते. सचिन वाझे आयोगासमोर अनिल देशमुख यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करु लागले. यावेळी आयोगाकडून त्याला रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला. ‘आपण असे करु नका, माझ्या चांगुलपणाचा फायदा घेऊ नका, असे आयोगाने सचिन वाझेंना सांगितले.

परमबीर सिंह-वाझे भेटीवरुन आयोगाने सुनावलं

परमबीर सिंह सोमवारी चांदिवाल यांच्या अध्यक्षतेखालील चौकशी आयोगापुढे हजर झाले. चौकशी आयोगाने यावेळी परमबीर सिंह यांच्याविरोधात जारी केलेला जामीनपात्र वॉरंट रद्द केला तसंच १५ हजार रुपये दंड ठोठावला. दरम्यान यावेळी परमबीर सिंह आणि सचिन वाझे आमने-सामने आले होते. सुमारे तासभर दोघे एकत्र गप्पा मारत होते.

अनिल देशमुख यांच्या वकिलांनी आपली नाराजी न्यायमूर्ती चांदीवाल यांच्यासमोर व्यक्त केली. आयोगाने सचिन वाझेंना आयोगासमोर हजर करण्याचे आदेश दिले आणि ताकीद दिली. आमच्याकरता सर्व अधिकारी समान आहेत. यापेक्षा तुम्ही बाहेर थांबा पण कोणाला भेटू नका, कोणाशी बोलू नका. बोलायचे असल्यास, भेटायचे असल्यास कायदेशीर परवानगी घ्या’’ असे सांगून आयोगाने नाराजी व्यक्त केली.

याचदरम्यान परमबीर सिंह यांनी आयोगाला एक प्रतिज्ञापत्र दिले. त्यात त्यांनी ‘‘आपल्याकडे अजून काहीही पुरावे नाहीत, जे काय आहे ते मी याआधीच यंत्रणांना दिले आहेत,” असं सांगितलं.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Sachin waze retired justice ku chandiwal commission nia custody anil deshmukh parambir singh sgy

ताज्या बातम्या