प्रसाद रावकर
सेवा निवासस्थान धोकादायक झाल्याने गेली १५ वर्षे हेलपाटे
निवासस्थान धोकादायक झाल्यामुळे फोर्ट परिसरातून हद्दपार व्हावे लागलेले तब्बल १३६ सफाई कामगार १५ वर्षांनी मूळ ठिकाणी वास्तव्यास येणार आहेत. त्यांच्या सेवा निवासस्थानाची इमारत उभी राहिली आहे. नव्या इमारतीत ८६ कुटुंबांनाच घर मिळणार आहे. उर्वरित ५० कामगारांची कुलाबा आणि पलटन रोड येथील पालिकेच्या संक्रमण शिबिरात व्यवस्था करण्यात येणार आहे.
फोर्ट परिसरातील कालिकत कोचीन स्ट्रीट येथील घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या सेवा निवासस्थानाच्या तीन इमारतींमध्ये १३६ सफाई कामगार वास्तव्यास होते. हे सफाई कामगार दक्षिण मुंबईमधील रस्त्यांची साफसफाई करीत. घराजवळच्याच रस्त्यांची सफाई करण्यासाठी त्यांना वेळेवर पोहोचणे शक्य होत असे, मात्र या इमारती धोकादायक झाल्यामुळे पालिकेने १५ वर्षांपूर्वी त्या रिकाम्या केल्या. या सर्व सफाई कामगारांची पालिकेने शीव येथील उदंचन केंद्राजवळील संक्रमण शिबिरात रवानगी केली होती. या परिसरातील असुविधा आणि भल्या पहाटे शीव येथून दक्षिण मुंबईत येताना या कामगारांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत होता.
कालिकत कोचीन स्ट्रीटवरील सेवा निवासस्थानांतील इमारतींच्या जागी दोन इमारती उभ्या राहिल्या आहेत. या चार आणि पाच मजली इमारतींमध्ये १५० चौरस फुटांच्या ८६ सदनिका बांधण्यात आल्या आहेत. मात्र पूर्वी या ठिकाणी तीन दुमजली इमारती आणि बैठय़ा घरांमध्ये १३६ सफाई कामगार वास्तव्याला होते. नव्या इमारतीमध्ये १३६ पैकी ८६ कामगारांच्या कुटुंबांना जागा देण्यात येणार आहे. शिवसेनेचे माजी नगरसेवक गणेश सानप यांनी उर्वरित ५० कामगारांची कुलाबा आणि पलटन रोड येथील घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या संक्रमण शिबिरात व्यवस्था करण्यासाठी पाठपुरावा सुरू केला आहे.
जानेवारीच्या अखेरीस कालिकत कोचीन मार्गावर उभ्या राहिलेल्या दोन इमारतींमधील घरात सफाई कामगारांना वास्तव्यासाठी जाता येईल. युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या हस्ते या सफाई कामगारांना घराच्या चाव्या देण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.
‘ना हरकत’ प्रमाणपत्र नाही
या दोन इमारतींना अद्याप मुंबई पोर्ट ट्रस्टकडून ‘ना हरकत’ प्रमाणपत्र मिळालेले नाही. त्यामुळे या नव्या इमारतींमधील घरात वास्तव्यास जाण्यासाठी सफाई कामगारांना प्रतीक्षा करावी लागत आहे. मुंबई पोर्ट ट्रस्टच्या अधिकाऱ्यांकडे ‘ना हरकत’ प्रमाणपत्र मिळविण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. पालिकेकडून शुल्काची रक्कम भरल्यानंतर ‘ना हरकत’ प्रमाणपत्र मिळेल. लवकरच ही प्रक्रिया पूर्ण होईल आणि सफाई कामगारांना नव्या घरात जाता येईल, असे स्थानिक नगरसेविका सुजाता सानप यांनी सांगितले.