चर्चगेट ते बोरिवली या स्थानकांदरम्यान प्रायोगिक तत्त्वावर सेवा

महिलांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे, टॉकबॅक प्रणाली, व्हॉट्स अ‍ॅप ग्रुप असे विविध प्रयोग केल्यानंतर पश्चिम रेल्वेने आता महिला प्रवाशांसाठी ‘आयवॉच वुमन’ हे अ‍ॅप्लिकेशन आणले आहे. यासाठी एका खासगी कंपनीची मदत घेण्यात आली असून शुक्रवारपासून ही सेवा महिनाभरासाठी प्रायोगिक तत्त्वावर उपलब्ध झाल्याचे पश्चिम रेल्वे आरपीएफकडून स्पष्ट करण्यात आले.

पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट ते बोरिवली या स्थानकांदरम्यान ही सेवा सुरू करण्यात आली आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यास इतर स्थानकांवरही ही सुविधा देण्यात येईल. आयवॉच वुमेन या अ‍ॅप्लिकेशनवरून आपत्कालीन परिस्थितीत मदत मागता येईल. मदतीसाठी स्क्रीनवर स्पर्श केल्यावर पाच सेकंदामध्ये आरपीएफ कंट्रोलरूम आणि मोबाइल क्रमांकाची नोंदणी असलेल्या नातेवाईकांना आपत्कालीन संदेश आणि ईमेल पाठवला जाईल. त्यासोबतच एक चित्रफीत आणि ध्वनिफीतही आरपीएफला मिळेल. आरपीएफचे शीघ्र कृती दल महिला प्रवाशांची मदत करण्यासाठी पोहोचतील.

अ‍ॅण्ड्रॉइड, आयओएस या ऑपरेटिंग सिस्टीमवर हे अ‍ॅप्लिकेशन डाऊनलोड करता येईल. विशेष म्हणजे रेल्वे हद्दीतून आपत्कालीन बटन दाबले तरच याबाबतचा संदेश आरपीएफला जाईल, अन्यथा केवळ नातेवाईकांना संदेश जाईल.

जीपीएस यंत्रणेच्या माध्यमातून ट्रेन कुठे पोहोचत आहे याची माहितीही मिळेल तसेच मोबाईलमधील बॅटरी किती प्रमाणात शिल्लक आहे, त्याचीही कल्पना येईल. महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी ही सेवा सुरू करण्यात आली आहे. यामुळे महिलांना सुरक्षित प्रवास करता येईल.  –उदय शुक्ला, महानिरीक्षक, पश्चिम रेल्वे