पहिल्या टप्प्यास आरंभ
मुंबई : मेट्रो २ अ आणि ७ मार्गिका खुला करण्याच्यादृष्टीने शनिवारपासून या दोन्ही मार्गिकांवरील पहिल्या टप्प्यातील सुरक्षा चाचणीला सुरुवात झाली. मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्त (सीएमआरएस) यांच्या मार्फत ही चाचणी सुरू असून हे काम आठवडाभर चालेल. चाचणी यशस्वी झाल्यानंतर पहिला टप्पा सुरू करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
मेट्रो २ अ (दहिसर ते डीएन नगर) मधील डहाणूकरवाडी ते आनंद नगर आणि मेट्रो ७ (दहिसर पूर्व ते अंधेरी पूर्व) मधील दहिसर ते आरे अशा पहिल्या टप्प्यातील मार्गिकेचे काम पूर्ण झाले आहे. आता हा टप्पा वाहतूक सेवेत दाखल करण्याच्यादृष्टीने अंतिम टप्प्यात आहे. सुरक्षा चाचणी आणि सुरक्षा प्रमाणपत्र मिळविणे असा हा अंतिम टप्पा आहे. सीएमआरएसचे पथक मुंबईत दाखल झाले असून त्यांनी दोन्ही मार्गिकांवरील पहिल्या टप्प्यातील सुरक्षा चाचणीला सुरुवात केल्याची माहिती महानगर आयुक्त एस.व्ही.आर. श्रीनिवास यांनी दिली.
या सुरक्षा चाचणीअंतर्गत रूळ, सिग्नल यंत्रणा आणि इतर तांत्रिक बाबींची पाहणी तसेच तपासणी केली जाणार आहे. सध्या एक पथक तपासणी, पाहणी करीत आहे. शनिवार, रविवार अशी ही पाहणी असेल. त्यानंतर दुसरे पथक येईल आणि त्यांच्याकडून ही प्रक्रिया पुढे नेली जाईल. किमान आठवडाभर ही चाचणी सुरू राहील असेही श्रीनिवास यांनी सांगितले.
चांगल्या दर्जाची ग्वाही
ही चाचणी पूर्ण झाल्यानंतर सीएमआरएसच्या काही सूचना असतील, बदल असतील तर त्यानुसार यंत्रणेत सुधारणा करून घेण्यात येईल. पण आम्हाला खात्री आहे की आम्ही प्रकल्पाचे काम अत्यंत चांगल्याप्रकारे केले आहे. त्यामुळे प्रमाणपत्र मिळण्यात अडचण येणार नसल्याचे महानगर आयुक्त एस.व्ही.आर. श्रीनिवास यांनी स्पष्ट केले आहे. तर प्रमाणपत्र मिळाल्यानंतर दोन्ही मार्गिकेवरील पहिला टप्पा कधी सुरू करायचा याचा निर्णय घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.