पश्चिम द्रुतगती महामार्गाला छत्रपती शिवाजी महाराज मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल-टूशी जोडणाऱ्या सहार उन्नत मार्गाचे उद्घाटन बुधवारी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते झाले. उन्नत मार्गावरच उभारलेल्या एका मंडपात झालेल्या या उद्घाटन सोहळ्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह आघाडी सरकारमधील काही आमदारही उपस्थित होते. विशेष म्हणजे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री या दोघांनी या प्रसंगी केलेल्या भाषणांत आघाडी सरकारच्या १० वर्षांतील कार्याचा आढावा घेत आगामी निवडणुकांवर लक्ष ठेवून प्रचारकाची भूमिका वठवली. दोन किलोमीटरच्या या उन्नत मार्गामुळे पश्चिम द्रुतगती महामार्ग ते विमानतळ हे अंतर केवळ पाच मिनिटांत कापणे शक्य होणार आहे.
समारंभाचे अध्यक्ष अजित पवार यांनी भाषण करताना आघाडी सरकारने किती सक्षमपणे मुंबईच्या पायाभूत सुविधांचा विकास करण्याचे काम केले आहे, हे ठसवले. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही आघाडी सरकार मुंबईला आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा देण्यासाठी कटिबद्ध आहे, असे सांगितले.
येत्या महिन्याभरात मेट्रो प्रकल्पाचा पहिला टप्पा, सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोड, पूर्व मुक्तमार्गाचा उर्वरित टप्पा या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचे उद्घाटन व लोकार्पण सोहळा होईल, अशी ग्वाहीदेखील त्यांनी दिली.

उन्नत मार्गावर कसे जाल?
पश्चिम द्रुतगती मार्गावरून बोरिवलीकडे जाताना विलेपार्ले येथील आंतरदेशीय विमानतळाजवळील उड्डाणपुलापुढे एक भुयारी मार्गिका तयार करण्यात आली आहे. ही मार्गिका सहार उन्नत मार्गाचाच एक भाग असून त्याद्वारे उन्नत मार्गाकडे जाता येणार आहे. त्याचप्रमाणे बोरिवलीहून मुंबईकडे येताना अंधेरी येथील गोल्डस्पॉट सिग्नलच्या पुढे एक मार्गिका उन्नत मार्गाकडे जाते. अंधेरी-कुर्ला मार्गावरून लीला हॉटेलकडून विमानतळाच्या दिशेला वळल्यानंतर डाव्या हाताला लगेचच या उन्नत मार्गावर जाणारी मार्गिका आहे.