बॉलीवूड ‘दबंग’ खान सलमानच्या ‘हिट अँड रन’ खटल्यातील महत्त्वाची कागदपत्रे गहाळ झाल्याची धक्कादायक माहिती मुंबई पोलिसांनी गुरूवारी न्यायालयासमोर दिली. त्यामुळे या प्रकरणाच्या सुनावणीला आता आणखी विलंब होणार आहे.
‘हिट अँड रन’ प्रकरणातील साक्षीदारांच्या जबाबाच्या मूळ प्रती आणि ज्या दिवशी घटना घडली त्यादिवशी घटनेची सविस्तर नोंद झालेली स्टेशन डायरी अशी महत्त्वाची कागदपत्रे गहाळ झाल्याचे मुंबई पोलिसांनी न्यायालयासमोर कबुल केले आहे. यावर न्यायालयाने मुंबई पोलिसांना आता १२ सप्टेंबरपर्यंत सर्व कागदपत्रांचा छडा लावण्याचे आदेश दिले आहेत. त्यासोबतच या प्रकरणातील सर्वात पहिले तपास अधिकारी किसन सिंघडे यांनाही नोटीस पाठवून न्यायालयात हजर राहण्यास सांगितले आहे.
या प्रकरणाशी संबंधित एकूण ६३ जणांचा जबाब मुंबई पोलिसांतर्फे नोंदविण्यात आला होता. त्यापैकी केवळ ७ साक्षीदारांच्या जबाबाची मूळ प्रत पोलिसांकडे आहे मात्र उर्वरित ५६ साक्षीदारांच्या जबाबाची प्रती गहाळ झाल्या आहेत.
कायद्याने साक्षीदारांच्या जबाबाच्या मूळ प्रती न्यायालयासमोर सादर करणे बंधनकारक आहे पण, पोलिसांकडे मूळ प्रत उपलब्ध नसल्याने प्रकरणाची सुनावणी करता येणार नाही अशी बाजू सलमानचे वकील श्रीकांत शिवडे यांनी न्यायालयासमोर मांडली, तर फिर्यादीपक्षाच्या वकीलांनी जबाबाची सत्य प्रत अधिकृत धरून पुढील सुनावणी होऊ शकते असे म्हटले.
न्यायाधीश डी.डब्ल्यू.देशपांडे यांनी यावर मुंबई पोलिसांना येत्या १२ सप्टेंबरपर्यंत यावर स्पष्टीकरण देण्यास सांगितले आहे. त्यानंतरच कोणत्या कागदपत्रांच्या आधारे सुनावणी पुढे न्यायचा याचा निर्णय घेण्यात येईल असेही न्यायालयाने म्हटले आहे.