आर्यन खानप्रकरणी खंडणीचा आरोप
मुंबई : क्रूझवरील अमली पदार्थ पार्टीप्रकरणी अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन याला सोडून देण्याबाबत शाहरूखच्या व्यवस्थापकाला संपर्क साधून खंडणीची मागणी केल्याचा आरोप असलेला सॅम डिसोजा याने अटकपूर्व जामिनासाठी बुधवारी उच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र कनिष्ठ न्यायालयात न जाता थेट उच्च न्यायालयात याचिका के ल्याचे स्पष्ट करत न्यायालयाने त्याची याचिका फे टाळली.
सुट्टीकालीन न्यायमूर्ती सुरेंद्र तावडे यांच्यासमोर रात्री १०च्या सुमारास डिसोजा याची याचिका सुनावणीस आली. त्या वेळी कनिष्ठ न्यायालयात दाद मागण्याऐवजी थेट उच्च न्यायालयात याचिका के ली आहे. आधी कनिष्ठ न्यायालयात दाद मागा, असे स्पष्ट करत न्यायालयाने त्याला तातडीचा दिलासा देण्यास नकार दिला.
डिसोजा याने केलेल्या याचिकेनुसार, या प्रकरणातील वादग्रस्त पंच किरण गोसावी याने त्याला शाहरूखची व्यवस्थापक पूजा ददलानीला फोन करून तिच्याकडे आर्यनला सोडून देण्यासाठी ५० लाख रुपये मागण्यास सांगितले होते. मात्र केंद्रीय अमली पदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी) आर्यनला अटक केल्यानंतर ही रक्कम ददलानीला परत करण्यात आली. आर्यनकडून कोणत्याही प्रकारचे अमली पदार्थ सापडलेले नाही आणि तो निर्दोष असल्याचेही गोसावीने आपल्याला सांगितल्याचा दावा डिसोजाने केला आहे.
या प्रकरणी आपल्याला गोवण्यात आले आहे. या प्रकरणातील किरण गोसावी आणि त्याचा अंगरक्षक व पंच साक्षीदार प्रभाकर साईल हे मुख्य सूत्रधार असून ते घोटाळेबाज असल्याचा दावा डिसोजा याने केला आहे. सुनील पाटील नावाच्या व्यक्तीकडून आपल्याला क्रूझवरील पार्टीबाबत कळले. तसेच त्यानेच आपल्याला गोसावीने साईलच्या माध्यमातून ददलानीकडून पैसे मागितल्याचेही सांगितल्याचा दावाही डिसोजाने केला आहे; परंतु गोसावी आणि साईल हे घोटाळेबाज असल्याचे कळल्यावर आपण ददलानीकडून घेतलेले पैसे परत मिळवले. तसेच तिला ते परतही केल्याचेही डिसोजा याने याचिकेत म्हटले आहे.
…म्हणून संरक्षण द्या
आर्यनला सोडण्यासाठी एनसीबी अधिकाऱ्यांसह आपण १८ कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली होती, असा आरोप आहे. या आरोपांच्या चौकशीसाठी राज्य सरकारने विशेष तपास पथक स्थापन (एसआयटी) केले आहे. आपल्याला या प्रकरणी अटक होऊ शकते. म्हणूनच आपल्याला अटकेपासून संरक्षण देण्याची मागणी डिसोजा याने केली होती. तसेच आपल्याविरोधात कोणतीही कठोर कारवाई करायची असल्यास त्याआधी तीन दिवसांची नोटीस देण्याची मागणीही त्याने केली होती.