मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानावरील आंदोलनप्रकरणी नागपुरातून अटक करण्यात आलेल्या संदीप गोडबोले (४७) या कटात सहभागी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. या कटाबाबत ७ एप्रिलला झालेल्या बैठकीलाही गोडबोले उपस्थित असल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान याप्रकरणी सुट्टीच्या न्यायालयात गुरुवारी गोडबोलेला हजर केले असता न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. आतापर्यंत या प्रकरणात ११६ जणांना अटक करण्यात आली आहे.

वकील गुणरतन सदावर्ते यांना अटक केल्यानंतर याप्रकरणी नागपूर येथील एक व्यक्ती त्यांच्या संपर्कात असल्याचा दावा सरकारी पक्षाकडून न्यायालयात करण्यात आला होता. त्यानंतर नागपुरातील संदीप गोडबोले यांना मुंबई पोलिसांनी बुधवारी रात्री ताब्यात घेतले होते. पवारांच्या निवासस्थानी झालेल्या हल्ल्याच्या वेळी गोडबोले सदावर्तेच्या संपर्कात असल्याचा दावा केला जात

आहे. याप्रकरणी ७ एप्रिलला सदावर्तेचे निवासस्थान असलेल्या इमारतीच्या गच्चीवर एक  बैठक पार पडली होती. तेथे गोडबोलेही उपस्थित होते. सरकारी वकील प्रदीप घरात यांनी दिलेल्या माहितीनुसार गोडबोले या सगळय़ा कटात सूत्रधार म्हणून काम पाहत होता. गोडबोले आमदार निवासमध्ये थांबला होता. याबाबत पोलीस  तपास करत आहेत. घटनेच्या दिवशी दुपारी अडीच वाजता छोटय़ा छोटय़ा गटाने आंदोलनकर्ते जमण्यास सुरुवात झाली त्या वेळी सदावर्ते यांनी सकाळी १० ते दुपारी २ दरम्यान आंदोलनाबाबतची माहिती समाजमाध्यम व प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रतिनिधींना दिली होती.

आंदोलनाच्या दिवशीही गोडबोले सदावर्तेच्या संपर्कात होता. त्या वेळी गोडबोलेने सदावर्ते यांना ‘सर मीडिया पाठवला’ असा संदेश पाठवला होता. आंदोलनावेळी गोडबोले व आरोपी अभिषेक पाटील याचे बोलणे झाले होते. तसेच ‘महालक्ष्मी पेट्रोल पंप येथे या, तेथे मीडिया आला आहे, इथून जाऊ का?’ अशा आशयाचे संभाषण दोघांमध्ये झाले, असा आरोप आहे. त्यांचे पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत. त्यामुळे हे सर्व आंदोलन गोडबोलेंच्या देखरेखीखाली झाल्याचा पोलिसांना संशय आहे.

कोण हा गोडबोले ?

एसटी संपात सहभागामुळे बडतर्फ झालेल्या व पूर्वी यांत्रिक विभागात काम करणाऱ्या संदीप गोडबोले या कारागीर (क) पदावरील कर्मचाऱ्याला मुंबई पोलिसांनी नागपुरातून ताब्यात घेतले होते. गोडबोले हा बहुजन अधिकारी- कर्मचारी संघटनेचा विभागीय अध्यक्ष आहे. त्याने एलएलबीचे शिक्षण घेतले असून तो बऱ्याचदा मुंबईत अ‍ॅड. सदावर्ते यांना भेटला. बऱ्याचदा त्याने सदावर्ते यांच्यासह न्यायालय परिसरातही हजेरी लावली होती.