‘गेली २३ वर्षे मी या सुटकेच्या क्षणाची वाट पाहात होतो’, असे अभिनेता संजय दत्त याने येरवडा तुरुंगातून शिक्षा भोगून सुटल्यानंतर पत्रकारांना सांगितले. १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी म्हणून शिक्षा भोगून घरी परतलेल्या संजय दत्तचे युद्धावरून परतलेल्या सैनिकाचे स्वागत व्हावे अशा थाटात जंगी स्वागत करण्यात आले. आपल्यावरील दहशतवादी हा शिक्का न्यायालयाने पुसल्याचे तो म्हणाला.
सकाळी येरवडा तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर ते दुपारी मुंबईत पोहोचेपर्यंत आणि तिथून मग सिद्धिविनायकाचे दर्शन, नर्गिस यांच्या कबरीला भेट असा ‘दत्त’ सोहळाच सर्वसामान्यांनी गुरुवारी अनुभवला. पाली हिल येथील निवासस्थानी परतलेल्या संजयने प्रसिद्धिमाध्यमांशी संवाद साधताना सुटकेची ही भावना विलक्षण असल्याचे सांगितले. सेलिब्रिटी असल्याने शिक्षेत सूट देण्यात आली हे म्हणणेही त्याने खोडून काढले.
४४१ रुपयांची कमाई
शिक्षा भोगत असताना संजय दत्तला कारागृहामध्ये कागदी पिशव्या तयार करण्याचे काम देण्यात आले होते. त्याच्या कमाईतून खात्यात शिल्लक राहिलेले ४४१ रुपये कारागृह प्रशासनाने त्याला दिले.