शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार पक्षाला नवं नेतृत्व देण्यात अपयशी ठरल्याची टीका पक्षाचं मुखपत्र सामनातून केली. यानंतर शरद पवारांनी सामनाच्या अग्रलेखाला महत्त्व देत नसल्याचं वक्तव्य केलं. आता पवारांच्या याच टीकेला संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ते बुधवारी (१० मे) मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.

संजय राऊत म्हणाले, “चांगली गोष्ट आहे, शरद पवार सामनाला महत्त्व देत नाही म्हणाले. मात्र, मी कुठे म्हणतो सामनाला महत्त्व द्या. शरद पवार आमच्या सर्वांचे नेते आहेत.”

“त्यांनी राज्याच्या राजकारणाविषयी थोडं समजून घ्यावं”

सुनिल तटकरेंनी राऊतांच्या वक्तव्यांमुळे महाविकासआघाडीत अडचणी निर्माण होत असल्याची टीका केली. त्याला प्रत्युत्तर देताना संजय राऊत म्हणाले, “त्यांनी राज्याच्या राजकारणाविषयी थोडं समजून घेतलं पाहिजे. सामना मागील ४० वर्षांपासून राज्यातील राजकारणाविषयी आपलं मत नोंदवत आहे.”

“त्यांच्याबरोबर इतर कुणी नव्हतं तेव्हा सामनाच त्यांच्या…”

“त्यांच्याबरोबर इतर कुणी नव्हतं तेव्हा सामनाच त्यांच्या नेत्यांच्या समर्थनार्थ उभा होता. जर कुणाला त्यांचं मत मांडायचं असेल तर मांडू द्या. जर त्यांना काही चुकीचं वाटत असेल तर त्यांच्या पक्षाच्या प्रवक्त्यांनी समोर येऊन त्यांची बाजू मांडावी. आम्ही त्यांना कुठं रोखलं आहे. मी माझ्या पक्ष, राज्य आणि देशाविषयी बोलतो. यात त्यांचं पोट दुखण्याचं कारण नाही,” असं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं.

“त्यांनीही बोलण्याची हिंमत दाखवावी”

“मी माझ्या पक्षाची भूमिका आणि मतं मांडतो. त्यांनीही त्यांचं काही मत असेल, विचारसरणी असेल तर मांडावी. त्यांना कुणीही रोखलेलं नाही. त्यांनी बोलत रहावं, बोलण्याची हिंमत दाखवावी,” असंही राऊतांनी नमूद केलं.

शरद पवार काय म्हणाले होते?

दरम्यान, शरद पवारांनी आज साताऱ्यात रयत शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी सामनातील अग्रेलखातून करण्यात आलेल्या टीकेचा चांगलाच समाचार घेतला. “सामनातील अग्रलेखाला आम्ही महत्त्व देत नाही. त्यांना काहीही लिहू दे. आम्ही आमचं काम करत असतो. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आम्ही काय करतो, हे त्यांना माहिती नसतं. मात्र, आम्ही काय करतो हे आम्हाला ठाऊक असतं”, असे ते म्हणाले.

‘सामना’मध्ये नेमकं काय म्हटलं होतं?

“शरद पवार हे राष्ट्रीय पातळीवर मोठे नेते आहेत. त्यांच्या शब्दाला राष्ट्रीय राजकारणात मान आहे. मात्र, पक्ष पुढे नेईल असा वारसदार निर्माण करण्यात ते अपयशी ठरले आहे. त्यामुळेच निवृत्तीची घोषणा करताच पक्ष बुंध्यापासून हादरला व प्रत्येक जण आता आपले कसे होणार? या चिंतेने हादरून गेला”, अशी टीका सामनातून करण्यात आली होती.

हेही वाचा : “ज्यांनी भाजपात जाण्याचे संधान बांधले तेच नवा अध्यक्ष निवडीच्या समितीत”, ठाकरे गटाचा मोठा दावा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, संजय राऊतांनी मणिपूरमध्ये हिंसाचार होत असताना पंतप्रधान, गृहमंत्री आणि अनेक मंत्री कर्नाटक निवडणुकीचा प्रचार करत असल्यावरून हल्लाबोल केला. ते म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापासून संपूर्ण मंत्रिमंडळ, देशभरातील राज्याराज्यातील भाजपा नेते, राज्यांचे मुख्यमंत्री यांनी कर्नाटकात ठाण मांडलं. कर्नाटक निवडणुकीकरता पैशांचा महापूर आला. अगदी बजरंग बलीला निवडणुकीत उतरवलं. हनुमान चालिसा, वगैरे वगैरे. पण मी तुम्हाला सांगतो, यांना कोणताही देव पावणार नाही. बजरंग बलीच त्यांना गदाने मारणार आहे.”