मुंबईत सकल ‘हिंदू समाजा’च्या वतीने ‘हिंदू जनआक्रोश मोर्च’चं आयोजन करण्यात आलं होतं. लव्ह जिहाद, धर्मांतरण आणि लॅण्ड जिहाद विरोधात कायदा राज्यासह संपूर्ण देशात लागू व्हावा, अशी मागणी मोर्चाच्या वतीने करण्यात आली. यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपावर हल्लाबोल केला आहे.
“देशात नरेंद्र मोदी आणि अमित शाह या दोन शक्तिमान नेत्यांचं राज्य आहे. महाराष्ट्रात सुद्धा हिंदूंचं राज्य आलं, असं सांगण्यात येत आहे. तरीही काढलेला आक्रोश मोर्चा योग्यच आहे. कारण, हिंदू समजले जाणाऱ्या नेत्यांकडून न्याय मिळत नाही. म्हणून आक्रोश मोर्चा निघाला असेल तर त्यांचं स्वागत केलं पाहिजे,” असं संजय राऊत प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले.
हेही वाचा : धीरेंद्र कृष्ण महाराजांचे संत तुकाराम महाराजांविषयी आक्षेपार्ह विधान; म्हणाले “त्यांची पत्नी…”
“काश्मीरमध्ये काश्मिरी पंडित आक्रोश करत असून, न्याय मागत आहेत. मुलायमसिंह यादव यांनी राम सेवकांवर गोळ्या चालवल्या. मोदी सरकारने त्यांचं पद्मविभूषणाने गौरव केला आहे. त्याचा निषेध करण्यासाठी हा आक्रोश मोर्चा आहे. देशात हिंदू नेत्यांचं राज्य असताना, सुद्धा हिंदूंना आक्रोश करावा लागत आहे. हे हिंदूंच दुर्दैव आहे,” अशी खंत संजय राऊतांनी व्यक्त केली.
“देशात हिंदू समाजाचा आवाज दाबला जात आहे. त्यामुळे हा मोर्चा निघाला असेल, तर चांगली गोष्ट आहे. आठ वर्ष देशात मोदी आणि शाह यांचं राज्य आहे. तेव्हापासून सकल हिंदू समाजाचा आक्रोश सुरु झाला आहे,” असं संजय राऊत सांगितलं.