संसद कर्मचाऱ्यांच्या नवीन गणवेशावर सत्ताधारी पक्ष भाजपाचे निवडणूक चिन्ह ‘कमळ’ मुद्रित केले जात असल्याच्या वृत्तावरून काँग्रेसने भाजपावर सडकून टीका केली आहे. राष्ट्रीय प्राणी वाघ किंवा राष्ट्रीय पक्षी मोर यांचा समावेश करण्याऐवजी ‘कमळ’च का मुद्रित केले जात आहे, असा सवाल लोकसभेतील काँग्रेसचे प्रतोद मणिकम टागोर यांनी केला. यानंतर आता याच मुद्द्यावर शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही भाजपावर हल्लाबोल केला आहे.
संजय राऊत म्हणाले, “मोदी सरकारला संसदेतील कर्मचाऱ्यांच्या गणवेशावर कमळाचं फूल लावू द्या. मात्र, जनता २०२४ च्या निवडणुकीत पूर्ण चिखल लावणार आहे. हे बनावट कमळ लावून काहीही होणार नाही. लोक यांच्या तोंडावर चिखल लावणार आहेत.”
” या सरकारला मनोज जरांगे पाटील यांना मारायचं आहे”
मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे यांच्या उपोषणावर बोलताना संजय राऊत यांनी गंभीर आरोप केले. “या सरकारला मराठा आरक्षणावर काहीच करायचं नाही. हे सरकार घाबरट आहे. हे सरकार केवळ आश्वासन देतं. या सरकारला मनोज जरांगे पाटील यांना मारायचं आहे, संपवायचं आहे. त्यांना काहीही काळजी नाही,” असं म्हणत संजय राऊतांनी शिंदे-फडणवीस-पवार सरकारवर टीका केली.
ऋषी सुनक यांचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंवर केलेल्या शिंदेंच्या आरोपाला संजय राऊतांचं प्रत्युत्तर
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इंग्लंडचे पंतप्रधान ऋषी सुनक यांचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंच्या लंडनमधील घर आणि संपत्तीबाबत गंभीर आरोप केले होते. त्याबाबत विचारलं असता संजय राऊत म्हणाले, “मला याविषयी माहिती नाही, पण उद्धव ठाकरेंच्या लंडनमधील कथित घराच्या चाव्या अजय अश्रफ नावाच्या बिल्डरकडे असतील. अशाप्रकारे बोलल्याने त्यांच्यावरील ५० खोक्यांचे आरोप धुतले जाणार नाही हे त्यांनी लक्षात घ्यावं.”
हेही वाचा : “आरक्षणाला वेळ लागेल, तुम्ही ऐकत का नाही?”; मनोज जरांगे म्हणाले, “शिंदे-पवार…”
“या मुंबईसह ठाण्यात सध्या बिल्डरांचं राज्य सुरू आहे. हे सगळ्यांना माहिती आहे. यातून केलेली कमाई कोणत्या देशात जाते आणि कोणत्या बिल्डरच्या माध्यमातून जाते हेही सर्वांना माहिती आहे. आम्हाला बदनाम करून एकनाथ शिंदेंवरील डाग धुतले जाणार नाहीत,” असं प्रत्युत्तर संजय राऊतांनी दिलं.