सामनाचे कार्यकारी संपादक आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी देशातील इंधन दरवाढ आणि एकूणच महागाईच्या मुद्द्यावरून मोदी सरकारवर हल्लाबोल केलाय. महागाईचा भडका उत्साह जाळून टाकीत आहे. त्यावर सत्ताधारी भाजप पाकिस्तानात पेट्रोल १३७ रुपयांवर पोहचल्याची मखलाशी करत आहे. मात्र, ही वकिली करणाऱ्यांनी पाकिस्तानचे १३७ रुपये हिंदुस्थानात ५९ रुपये असल्याचं लक्षात घ्यावं, असं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं. तसेच देशात चुली विझत असताना, आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतःसाठी विशेष विमान खरेदी करत आहे, अशीही टीका राऊत यांनी सामनाच्या ‘रोखठोक’ या सदरातकेली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संजय राऊत म्हणाले, “दिवाळी येत आहे. दिवाळी असली काय नसली काय, आतषबाजी कमी आणि फटाकेच जास्त फुटत असतात. राजकीय आरोप-प्रत्यारोपांचे फटाके तर ३६५ दिवस फुटत असतात. कोरोनाचे निर्बंध कमी झाल्यामुळे या वेळची दिवाळी मोकळ्या वातावरणात साजरी होईल; पण सण साजरे करावे असे वातावरण आज खरेच आहे काय? महागाईचा भडका उत्सवांचा उत्साह जाळून टाकीत आहे. त्या आगीत सत्ताधाऱ्यांच्या जळजळीत वक्तव्यांची भर पडत आहे. महागाई टोकाची आहे. ती कमी करता येत नसेल तर होरपळणाऱ्या जनतेच्या जखमांवर मीठ तरी चोळू नका.”

“पाकिस्तानचे १३७ रुपये म्हणजे हिंदुस्थानात फक्त ५९ रुपये”

“सत्ताधारी भाजपची यावर मखलाशी कशी ती पहा. त्यांचा युक्तिवाद असा की, “महाराष्ट्रात किंवा देशात पेट्रोलने शंभरी पार केली म्हणून का रडता? पाकिस्तानातही पेट्रोल १३७ रुपयांवर पोहोचलेय!” पण ही वकिली करणाऱ्यांनी एक लक्षात घेतले पाहिजे की, हे ‘१३७’ पाकिस्तानी रुपयांत आहेत. जे हिंदुस्थानी रुपयांत ५९ रुपये होतात. हिंदुस्थानात पेट्रोलचे भाव दिल्लीत १०६ रुपये आणि मुंबईत ११५ रुपयांपर्यंत पोहोचले. यावर कुणी बोलत नाही व सगळेच राजकीय पक्ष मुंबईच्या समुद्रातील क्रुझ पार्टीत अडकून पडले,” असं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं.

“मोफत लसीकरणाची जाहिरात कोणाच्या पैशाने आणि का करीत आहात?”

संजय राऊत यांनी मोफत लसीकरणामुळे पेट्रोल डिझेलचे दर वाढले म्हणणाऱ्या मोदी स रकारच्या मंत्र्यालाही चांगलेच फटकारले. ते म्हणाले, “रामेश्वर तेली हे पेट्रोलियम खात्याचे राज्यमंत्री आहेत. त्यांना पत्रकारांनी विचारले, “साहेब, पेट्रोल-डिझेलमुळे लोकांचे जगणे कठीण झाले. काहीतरी करा!” यावर मंत्री महोदय काय सांगतात, “मोदींनी देशभरात मोफत करोना लसीची पूर्तता केल्यानं पेट्रोल-डिझेलचे भाव वाढले आहेत.” म्हणजे मोफत लसीकरणाचा भार शेवटी जनतेच्याच माथी मारला जात आहे. मग मोफत लसीकरणाची जाहिरात कोणाच्या पैशाने आणि का करीत आहात, हा प्रश्न देशाला पडला आहे. आता सत्य असे आहे की, संपूर्ण देशातील लसीकरणाचा खर्च ६७,११३ कोटी इतका दाखवला आहे. पण मोदी सरकारने पेट्रोल-डिझेलवर ‘कर’ लावून २५ लाख कोटींची वसुली आजपर्यंत केली आहे.”

“‘पीएम केअर फंड’ हे बिगर सरकारी खाते उघडून लाखो-कोटी रुपये जमा केले”

“पुन्हा कोविडशी मुकाबला करण्यासाठी ‘पीएम केअर फंड’ हे बिगर सरकारी खाते उघडून त्यात उद्योगपती, सरकारी उपक्रम यांच्या माध्यमातून लाखो-कोटी रुपये जमा केले ते वेगळेच. जनतेचे दिवाळे निघत आहे व राज्यकर्त्या पक्षाची ही अशी दिवाळी जोरात सुरू आहे. महागाईचे चटके कसे? तर इतक्या वर्षांत प्रथमच ‘माचीस बॉक्स’देखील दुपटीने महागला. एक रुपयांचा माचीस बॉक्स दोन रुपयांना झाला. रस्त्यावर जाता-येता सहज एक दुसऱ्याकडे ‘माचीस आहे का?’ असे विचारून विडी-सिगारेट शिलगावली जात होती आणि माचीस सहज दिली जात होती,” असं संजय राऊत यांनी सांगितलं.

“जनता विकासाची किंमत पेट्रोल-डिझेलच्या भाववाढीपासून माचीसपर्यंत चुकवत आहे”

राऊत म्हणाले, “एक-दुसऱ्याच्या घरात माचीसच्या काड्यांचे अदान-प्रदान होत असे. आज ती माचीसही महाग झाली. तेव्हा मला अश्मयुगातील माणूस आठवला. तेव्हा अग्नी कसा निर्माण करीत होते? दोन दगडांचे घर्षण करून अग्नी निर्माण केला जात असे. त्यातून चुली पेटवल्या जात असत. आताही बहुधा तेच दिसू लागेल. अयोध्येत राममंदिर निर्माण होतच आहे. त्यामुळे यानिमित्ताने नवे ‘रामराज्या’चेही दर्शन घडेल आणि ‘विकास’ म्हणजे काय तेसुद्धा लोकांना समजेल. विकासासाठी किंमत मोजावी लागते. ती किंमत पेट्रोल-डिझेलच्या भाववाढीपासून माचीसच्या भाववाढीपर्यंत जनता चुकवीत आहे.”

“चुली विझत आहेत, पण आपले पंतप्रधान स्वतःसाठी एक विशेष विमान खरेदी करत आहेत”

“उज्ज्वला अंतर्गत मिळणारे गॅस सिलेंडरही महाग झाले. अनेक राज्यांत लोकांनी ही सरकारी गॅस सिलेंडरही भंगारात विकून टाकली. महाराष्ट्रात महिलांनी महागाईविरोधात आंदोलन केले. त्यात अनेक ठिकाणी गॅस सिलेंडरचे श्राद्ध घालण्याचा कार्यक्रम पार पाडला. विनाअनुदानित गॅस सिलेंडरची किंमत ९०० पार झाली. माचीसची किंमत १४ वर्षांत वाढली नव्हती. कच्च्या मालाच्या किमती वाढल्यामुळे माचीसची किंमत वाढत आहे. पण आपले पंतप्रधान स्वतःसाठी एक विशेष विमान खरेदी करत आहेत व त्या विमानासाठी देशाच्या तिजोरीतून १८ हजार कोटी रुपये खर्च होतील,” असं मत राऊतांनी व्यक्त केलं.

“‘सेंट्रल व्हिस्टा’ प्रकल्पाने दिल्लीची आन-बान-शान धुळीस व खड्ड्यात मिळवली”

राऊत यांनी महागाई असताना विशेष विमान आणि सेंट्रल व्हिस्टाच्या प्रकल्पावरून मोदींना टोला लगावला. ते म्हणाले, “माचीस महागण्याशी, खाद्यतेल, पेट्रोल-डिझेल भाववाढीशी या १८ हजार कोटींच्या खासगी विमान खरेदीचा संबंध जोडू नये. पंतप्रधानांच्या सोयीसाठी असे एक विमान असणे ही गरज आहे. पण माचीस, तेल, नोकऱ्या, पगार ही लोकांची ‘चैन’ झाली आहे, त्याचे काय? दिल्लीत २० लाख कोटी रुपये खर्च करून ‘सेंट्रल व्हिस्टा’ प्रकल्प हट्टाने उभा केला जात आहे. त्यासाठी दिल्लीची आन-बान-शान धुळीस व खड्ड्यात मिळवली आहे.”

हेही वाचा : “…जणूकाही त्यांच्या गर्भातूनच हे लोक जन्माला आलेत”, पंच प्रभाकर साईलच्या आरोपांवरून संजय राऊतांचं भाजपावर टीकास्त्र!

“संपूर्ण नवी दिल्लीचे रूपांतर खोदकामात झाले. नवी संसद, नवी कार्यालये, पंतप्रधानांचे नवे निवासस्थान हे सर्व जनतेवर लादलेल्या महागाईच्या ओझ्यातून उभे राहणार असेल, तर काय करायचे? संतापाच्या भरात काही पेटवायचे म्हटले तर माचीसची काडीही महाग झाली. तरीही दिवाळी येतच आहे. ती साजरी करूया, दिवे पेटवूया. त्या प्रकाशातच नवा मार्ग शोधता येईल,” असं सूचक भाष्य राऊत यांनी केलं.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay raut criticize modi government over fuel price hike and inflation in saamana rokhthok pbs
First published on: 31-10-2021 at 10:50 IST