‘साराभाई व्हर्सेस साराभाई’ मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्री रुपाली गांगुली हिच्यावर रविवारी दोन व्यक्तींनी भररस्त्यात अपघातानंतर हल्ला केल्याची घटना घडली. रुपाली तिच्या पाच वर्षांच्या मुलाला शाळेत घेऊन जाताना अंधेरी इथं हा प्रकार घडला. बाजूने जाणाऱ्या बाईकला तिच्या कारचा हलका धक्का लागल्याने बाईकस्वार आणि त्याच्या मागे बसलेल्या व्यक्तींनी रुपालीच्या कारची काच फोडली. त्यांची माफी मागितली असतानाही त्या दोन व्यक्तींनी राग काढल्याची तक्रार रुपालीने केली आहे. घडलेला हा सर्व प्रकार तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

या घटनेत रुपालीच्या हाताला जखम झाली असून वर्सोवा पोलीस स्थानकांत तिने तक्रार नोंदवली आहे. तिच्या हाताला जखम झाली असतानाही रस्त्यावरील कोणीच तिच्या मदतीला आलं नसल्याची खंतही तिने व्यक्त केली. ‘सकाळी साडेआडच्या सुमारास रस्त्यावर दोन अज्ञात व्यक्ती माझ्यावर हल्ला करतात आणि माझ्या गाडीची काच फोडतात आणि रस्त्यावर जाणारे- येणारे मात्र फक्त बघत राहतात. सर्वजण फक्त तमाशा बघायला उभे होते, पण मदतीला कोणीच आलं नाही,’ अशा शब्दांत रुपालीने संताप व्यक्त केला.

rupali ganguly
रुपाली गांगुली

तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तिथले सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यानंतर काही तासांच्या आतच पोलिसांनी दोघा हल्लेखारांना गजाआड केले. पोलिसांकडून सध्या या दोन्ही व्यक्तींची कसून चौकशी सुरु आहे.