स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकातर्फे देण्यात येणाऱ्या यंदाच्या विज्ञान पुरस्कारासाठी आंध्र प्रदेश येथील डॉ अमोल गोखले यांची निवड करण्यात आली आहे. येत्या २८ मे रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीदिनी दादर (पूर्व) येथील सावरकर स्मारकात होणाऱ्या कार्यक्रमात डॉ. गोखले यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
देशासाठी आवश्यक असलेली शस्त्र सामग्री, विमाने यासाठी वजनाने हलकी पण मजबूत अशी धातुमिश्रणे बनविण्यासाठी डॉ. गोखले यांनी संशोधन केले आहे. १७०० अंश सेंटिग्रेड इतकी उष्णता सहन करणारे व हवेशी घर्षणाने निर्माण करणारे संभाव्य ज्वलन वाचविणारी मिश्र धातूंची संरक्षण आवरणेही त्यांनी तयार केली आहेत.
विज्ञानातून देशहिताचे कार्य करण्यासाठी डॉ. गोखले यांना या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. डॉ. गोखले हे डिफेन्स रिसर्च अॅण्ड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन संस्थेशी संबंधित आहेत.