मराठवाडय़ाला दुष्काळातून कायमचे बाहेर काढण्यासाठी मराठवाडा वॉटर ग्रिड योजना राबविण्यात येत असून औरंगाबाद व जालना जिल्ह्य़ांच्या चार हजार २९३ कोटींच्या कामाला यापूर्वीच मान्यता देण्यात आली आहे. बीड जिल्ह्य़ाच्या चार हजार ८०० कोटींच्या प्रस्तावालाही मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली असून या योजनेच्या माध्यमातून मराठवाडय़ातील ११ धरणे एकमेकांना जोडण्यात येणार असून त्यासाठी हायब्रीड अॅन्युइटी तत्त्वावर निविदा काढण्यात येणार असल्याची माहिती पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर यांनी दिली.
मराठवाडय़ातील दुष्काळी परिस्थितीवर उपाययोजना करण्यासाठी वॉटर ग्रिड उभारण्याचा निर्णय औरंगाबाद येथे झालेल्या मंत्रिमंडळाच्या विशेष बैठकीत घेण्यात आला होता. या योजनेसाठी पूर्व-व्यवहार्यता अहवाल तयार करण्यासाठी गेल्या वर्षी निविदा काढण्यात आली होती. त्यानुसार इस्रायलच्या मेकोरोट डेव्हलपमेंट अॅण्ड एंटरप्रायजेस कंपनीसोबत करार करण्यात आला.
या करारानुसार सहा टप्प्यांत विविध अहवाल व १० प्राथमिक संकलन अहवाल असे सर्व अहवाल फेब्रुवारी २०२० पर्यंत सादर करण्यात येणार आहेत. या कार्यवाहीअंतर्गत औरंगाबाद व जालना जिल्ह्य़ांसाठी यापूर्वीच ४ हजार २९३ कोटींच्या कामासाठी निविदा मागविण्यास राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली होती. आज मराठवाडा वॉटर ग्रिडअंतर्गत बीड जिल्ह्य़ासाठी प्रस्तावित ग्रीडच्या मुख्य व दुय्यम जलवाहिन्या, जलशुद्धीकरण यंत्रणा यासह विविध ठिकाणी आनुषंगिक कामांसाठी चार हजार ८०२ कोटींच्या पहिल्या प्रस्तावास मंत्रिमंडळाने मान्यता दिली असून हायब्रीड अॅन्युइटी तत्त्वावर या कामांसाठी निविदा काढण्यात येणार असल्याचे लोणीकर यांनी
सांगितले. बीड जिल्ह्य़ात वॉटर ग्रिडची कामे करण्यासाठी पात्रता अर्ज मागविण्यास मान्यता देण्यात आली. त्यात बीड जिल्ह्य़ात एक हजार ७८ किलोमीटर पाइप लाइन प्रस्तावित आहे.
या योजनेच्या माध्यमातून मराठवाडय़ात पाण्याची उपलब्धता कमी असल्यामुळे पिण्याचे पाणी, शेतीचे पाणी व उद्य्ोगासाठी लागणारे पाणी यांची एकत्रित ग्रिड करण्यात आली असून दुसऱ्या टप्प्यात दमणगंगा-पिंजाळ, तापी-नार-पार व कोकणातून समुद्रात वाहून जाणारे पाणी आणि कृष्णा खोऱ्यातील पाणी मराठवाडय़ाकडे वळविण्यात येणार आहे.
मराठवाडय़ात एक हजार ३३० किलोमीटर मुख्य पाइपलाइन टाकण्यात येणार असून जायकवाडी, निम्न दुधना, सिद्धेश्वर, येलदरी, इसापुर, विष्णुपुरी, माजलगाव, निम्न मनार, मांजरा, निम्न तेरणा व सिना कोळेगाव ही ११ धरणे परस्परांना जोडण्यात येणार आहेत. त्यानंतर जलशुद्धीकरणाची पक्रिया राबवून तालुक्यापर्यंत शुद्ध पाणी वाहून नेण्यासाठी तीन हजार २२० किलो मीटर दुय्यम पाइप लाइन टाकण्यात येणार आहे.