नौदलाच्या ‘सिंधुरक्षक’ या पाणबुडीला जलसमाधी मिळून एक दिवस उलटून गेला तरीही या पाणबुडीतील नौदलाच्या १८ जवानांचा अद्यापही शोध लागलेला नाही. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेविषयी नौदल आणि या जवानांच्या नातेवाईकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. मात्र या पाणबुडीतील जवानांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न अद्यापही सुरूच आहेत, असे नौदलाच्या सूत्रांनी सांगितले. पाणबुडीवर झालेल्या स्फोटांची आणि त्यानंतर भडकलेल्या आगीची तीव्रता प्रचंड असल्याने पाणबुडीतील अनेक भाग वितळले आहेत. यामुळे मदतकार्यात अडथळा येत आहे.
पाणबुडीत अडकलेल्या १८ जवानांचा शोध घेण्यात प्रचंड अडथळे आहेत. आगीमुळे आणि स्फोटांमुळे पाणबुडीच्या अंतर्गत भागातील अनेक भाग इतस्तत: पसरले आहेत. यापैकी काही भाग वितळले असल्याने पाणबुडीत शिरणेही अडचणीचे झाले आहे. पाणबुडीत अजूनही प्रचंड पाणी भरलेले आहे. हे पाणी बाहेर काढण्यासाठी प्रचंड शक्तीचे पंप लावले आहेत. मात्र अजूनही पाणी फारसे बाहेर आलेले नाही, असे सूत्रांनी सांगितले.
संरक्षणमंत्री ए. के. अॅण्टनी आणि नौदलप्रमुख डी. के. जोशी यांनी बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ‘चांगले घडेल अशी आशा आणि वाईट बातमीची तयारी’ बाळगत असल्याचे सांगितले होते. नौदलाच्या जवानांचा पत्ता लागला नसला, तरीही चमत्कार घडतात, असेही यावेळी नौदलप्रमुख म्हणाले. मात्र आता पाणबुडी बुडून एका दिवसापेक्षा जास्त काळ उलटून गेल्याने नौदल आणि जवानांचे कुटुंबीय यांच्यात चिंतेचे वातावरण आहे.
‘त्यांच्या’ जिवाचा घोर कायम
‘सिंधुरक्षक’मध्ये स्फोट झाला, त्या वेळी पाणबुडीत पंधरा नौसैनिक आणि तीन अधिकारी होते. पंधरापैकी सहा नौसैनिक विवाहित होते, तर तीनपैकी दोन अधिकाऱ्यांचे लग्न झाले होते. यापैकी काहींना अडीच-तीन वर्षांची मुलेही आहेत. या जवानांपैकी कोणाचाही ठावठिकाणा लागत नसल्याने या १८ जणांच्या कुटुंबीयांच्या जिवाचा घोर कायम आहे. नौदलप्रमुखांचे ‘होपिंग फॉर द बेस्ट अॅण्ड प्रीपेअर फॉर द वर्स्ट’ हे विधान सूचक असले, तरी नौदलानेही अद्याप आशा सोडलेली नाही. पाणबुडीत हवाबंद जागेत हे जवान गेले असतील किंवा काहींच्या हाती ऑक्सिजन मास्कही लागल्याची शक्यता आहे, अशी आशा नौदलप्रमुखांनी व्यक्त केली होती. मात्र एका दिवसापेक्षा जास्त कालावधी उलटून गेला असल्याने नौसैनिकांबरोबरच या जवानांचे कुटुंबीयही चिंतातुर आहेत.
बेपत्ता सिंधुरक्षक :
अधिकारी : १) लेफ्टनंट कमांडर निखिलेश पाल – डेप्युटी कमांडर, २) लेफ्टनंट कमांडर आलोक कुमार – सिग्नल कम्युनिकेशन्स ऑफिसर, ३) लेफ्टनंट कमांडर आर. वेंकीटराज – अॅण्टी सबमरीन वॉरफेअर ऑफिसर,
इतर जवान : १) बी. सीताराम, २) मलय हल्दर, ३) ई. विकास, ४) व्ही. विष्णू, ५) डी. नरुत्तम, ६) ए. के. सिंग, ७) एल. लॉरेन्स, ८) सुनील कुमार, ९) ए. शर्मा, १०) राजेश टूटिका, ११) डी. प्रसाद, १२) केवल सिंग, १३) संजीव कुमार, १४) के. सी. उपाध्याय, १५) टी. सिन्हा