सेबी, प्राप्तिकर विभागामार्फतही स्वतंत्र चौकशी 

मुंबई :  शेअर मार्केटमधील निर्देशांकाच्या चढउतारावराशी संबंधित डब्बा ट्रेडिंगच्या प्रकरणाचे धागेदोरे गुजरातपर्यंत  पोहोचले आहेत. या सर्व गैरप्रकारात गुजरातमधील काही शेअर दलालांची मुख्य भूमिका असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.

अटकेतील आरोपींकडे सापडलेल्या नोंदींवरून त्यांनी गेल्या सात महिन्यांत सुमारे सहा हजार ८०० कोटी रुपयांची उलाढाल केल्याचे निष्पन्न झाले होते. हा सर्व व्यवहार अंगडियांच्या माध्यमातून रोखीने झाल्याने त्यात काळ्या पैशाचा वापर झाला आहे. त्यामुळे सेबी व प्राप्तिकर विभागही याप्रकरणी स्वतंत्र चौकशी करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

घाटकोपर येथील पार्कसाईट परिसरात हजारो कोटींचे डब्बा ट्रेिडग सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवडय़ात पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात तेथे ११ व्यक्ती समभागांच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार करत असल्याचे आढळून आले. बीएसई व एनएसई या स्टॉक एक्स्चेंजवरील समभाग व निर्देशांकाच्या चढउतारांवर सट्टा लावण्यात येत होता. या प्रकरणी महेश कटारिया, शैलेश नंदा, राजेश पटेल व दिनेश भानुशाली या चौघांना अटक केली होती. आर्थिक उलाढालीचा आवाका पाहता हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले होते. प्राथमिक तपासात अटक आरोपींच्या वरही काही गुजरातमधील काही मोठे दलाल असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात अपहाराची रक्कम आणखी वाढण्याची शक्यता आहे.