सीडीआर घोटाळ्यामुळे गुप्तहेरी उघड

नवऱ्याचे विवाहबाह्य़ संबंध आहेत का, कोणा तरुणींचे फोन येतात का आदी बाबी तपासण्यासाठी मुंबईतील अनेक महिलांनी खासगी गुप्तहेरांची नेमणूक केली होती. गुन्हे अन्वेषण विभागाने महिनाभरापूर्वी उघड केलेल्या कॉल डेटा रेकॉर्ड घोटाळ्यामुळे (सीडीआर) ही बाब उघड झाली आहे. तब्बल १३४ सीडीआर पोलिसांच्या हाती लागले असले तरी ही संख्या हजारोंच्या घरात असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे. हे बेकायदा सीडीआर पैशाच्या मोबदल्यात उपलब्ध करून देणाऱ्या संबंधित मोबाइल कंपन्यांचे नोडल अधिकारी सध्या रडारवर आहेत. अनेकांना लवकरच अटक होण्याची शक्यता आहे.

मोबाइल क्रमांकाचा सीडीआर देण्याचे अधिकार संबंधित कंपनीच्या नोडल अधिकाऱ्याला आहे. या अधिकाऱ्याच्या परवानगीशिवाय सीडीआर मिळत नाही. पोलीस तसेच अन्य तपास यंत्रणांना सीडीआर उपलब्ध होतो. मात्र त्यासाठी अतिरिक्त आयुक्त वा उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याकडून पत्र वा ईमेल आवश्यक असतो. अन्यथा अशा रीतीने मिळवलेला सीडीआर हा बेकायदा असतो. एका व्यक्तीकडे १३४ सीडीआर सापडल्यामुळे गुन्हे अन्वेषण विभागाच्या वांद्रे युनिटचे वरिष्ठ निरीक्षक महेश देसाई, नीतीन पाटील, राजेश पडवी आदींच्या पथकाने तपास सुरू केला तेव्हा अनेक गंभीर बाबी समोर आल्या. त्यापैकी असंख्य बायकांनी आपल्या नवऱ्यांना कोणाचे फोन येतात याची माहिती घेण्यासाठी काही खासगी गुप्तहेरांची मदत घेतल्याचे स्पष्ट झाले. या बायकांनी गुगलचा वापर करून ऑनलाइन गुप्तहेरांचे क्रमांक मिळविले. त्यांना संपर्क करून आपल्या पतीचे मोबाइल क्रमांक दिले. या गुप्तहेरांनी मोबाइलचे सीडीआरच दाखविल्याने बायकांचीही खात्री पटली. या गुप्तहेरांनी या बायकांकडून प्रति सीडीआर ५० हजार ते एक लाख रुपये घेतले. या बायका नवऱ्याचे उपद्व्याप जाणून घेण्याची इच्छुक असल्याचा पुरेपूर फायदा या गुप्तेहरांनी उठविला. त्यानंतर त्यांनी नवऱ्यांना दूरध्वनी करून बायकोला खोटा सीडीआर देण्यासाठीही पैसे उकळले. काही सीडीआरमध्ये कुठलेही वादग्रस्त क्रमांक नसतानाही ते घुसडल्याची माहिती याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या चार आरोपींकडून उघड झाली आहे. ही मोठी टोळी असावी, असा विश्वास वरिष्ठ निरीक्षक महेश देसाई यांनी वर्तविला आहे. उपायुक्त शशिकांत सातव व सहायक आयुक्त विनय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असून मोबाइल कंपन्यांतील सीडीआर पुरविणाऱ्या अधिकाऱ्यांची सध्या चौकशी केली जात आहे.

राजस्थानमधील पोलिसाचा सहभाग?

सीडीआर हे फक्त पोलिसांना मिळतात. दिल्ली पोलिसांनी अशाच प्रकरणात अटक केलेला सौरभ साहू हाही या प्रकरणात एक आरोपी आहे. त्याला सीडीआर पुरविणाऱ्या राजस्थान पोलिसांतील एका उपनिरीक्षकावर संशय आहे.