प्रसाद रावकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

स्वच्छ भारत अभियानासाठी गुप्त तपासणी

‘स्वच्छ भारत’ अभियानाअंतर्गत मुंबईची पाहणी करण्यासाठी दाखल झालेल्या केंद्रीय पथकाने आपले काम अत्यंत गुप्तपणे सुरू केले असून या पथकाचा ठावठिकाणा लागत नसल्यामुळे पालिका अधिकारी बेजार झाले आहेत. पालिका अधिकारी या पथकाचा माग घेण्याचा कसोशीने प्रयत्न करीत असून त्यांना अपयश आले आहे.

मुंबईतील १४० ठिकाणी पाहणी करून स्वच्छतेबाबतचा अहवाल हे पथक केंद्राला देणार आहे. हे काम पथकाच्या आवाक्याबाहेर असल्याने नागपूर येथील अन्य एका पथकाला मुंबईत पाचारण करण्यात आल्याने पालिका अधिकारी जास्तच धास्तावले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘स्वच्छ भारत’ अभियानाची साद घातल्यानंतर देशभरात स्वच्छताविषयक विविध कार्याक्रमांचे मोठय़ा प्रमाणावर आयोजन करण्यात आले. त्यानंतर शहरांमधील स्वच्छतेबाबत स्पर्धा घेण्यास सुरुवात झाली. यंदाही या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून मुंबईमधील स्वच्छतेची पाहणी करण्यासाठी केंद्राचे पथक मुंबईत दाखल झाले आहे. मुंबईमधील १४० ठिकाणी हे पथक पाहणी करणार असल्याची माहिती महापालिका अधिकाऱ्यांना मिळाली आहे. मात्र पाहणी नक्की कोणत्या ठिकाणी केली जाणार आहे, याबाबत पालिका अधिकारी अनभिज्ञ आहेत. त्यामुळे या ठिकाणांचा शोध घेण्याचा प्रयत्न पालिका अधिकाऱ्यांकडून सुरू असल्याचे समजते.

गेल्या वर्षी मुंबईत स्वच्छतेची पाहणी करण्यासाठी आलेल्या अभियानाच्या पथकातील अधिकाऱ्यांशी पालिका अधिकाऱ्यांनी संपर्क साधला होता. पथक आणि पालिकेच्या समन्वयातून पाहणी झाल्याचा आरोप त्यावेळी करण्यात आला होता. त्यामुळे मुंबईला मिळालेल्या गुणांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. तसेच पथकही वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची चिन्हे निर्माण झाली होती. ही बाब लक्षात घेत यावेळी मुंबईत दाखल झालेल्या पथकाने प्रचंड गुप्तता पाळली आहे.

मुंबईत १६ डिसेंबर रोजी पथक दाखल झाले आहे. हे पथक सार्वजनिक ठिकाणे, सार्वजनिक शौचालये, झोपडपट्टय़ा, विविध पर्यटनस्थळे आदींची पाहणी करणार आहेत. पाहणीसाठी अवधी कमी असल्यामुळे या पथकाच्या जोडीला नागपूरमधील पथकालाही पाचारण करण्यात आले आहे. सध्या या पथकातील १६ जण मुंबईत पाहणी करीत आहेत.

स्वच्छतेमध्ये मुंबईचा क्रमांक घसरू नये यासाठी पालिका अधिकाऱ्यांची धडपड सुरू आहे. पण नेमक्या कोणत्या भागात स्वच्छताविषयक काळजी घ्यायची हेच कळत नसल्यामुळे पालिका अधिकाऱ्यांचा गोंधळ उडाला आहे. हे पथक मुंबईत दाखल होताच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार घनकचरा व्यवस्थापन विभागातील सफाई कामगार, मुकादम, कनिष्ठ आवेक्षक, पर्यवेक्षक, सहाय्यक पर्यवेक्षक आदी कर्मचाऱ्यांना १२ तास काम करावे लागत आहे. मात्र त्याचा मोबदला मिळत नसल्यामुळे या कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. त्यामुळे केवळ स्वच्छतेचीच नव्हे तर सफाई कामगारांचीही पथकाने भेट घ्यावी, अशी मागणी कर्मचारी वर्गामधून होऊ लागली आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Secret check for the swachh bharat mission abn
First published on: 22-12-2019 at 01:43 IST