उद्योजक मुकेश अंबांनींच्या अँटिलिया या निवासस्थानाबाहेरील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. मुंबई पोलिसांना एका टॅक्सी चालकाने दिलेल्या एका महितीनंतर अँटिलियाच्या आजूबाजूला पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आल्याचं वृत्त इंडिया टुडेने दिलं आहे.

मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी, ८ नोव्हेंबर २०२१ रोजी मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुममध्ये एका टॅक्सी चालकाने फोन करुन माहिती दिल्यानंतर अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय.

मुंबई पोलिसांना फोन करुन माहिती देणारी व्यक्ती एक टॅक्सी चालक होती. आपल्या टॅक्सीमध्ये बसलेल्या दोन पर्यटकांनी आपल्याला उद्योजक मुकेश अंबानींच्या घराचा पत्ता विचारला. या दोघांकडे एक भली मोठी बॅग होती असंही या टॅक्सी चालकाने पोलिसांना सांगितल्याचं म्हटलं जात आहे. संशयास्पदरित्या या दोन व्यक्ती फिरत असल्याची माहिती या टॅक्सी चालकाने दिली आहे.

चालकाने ही माहिती दिल्यानंतर आझाद मैदान पोलीस स्थानकामध्ये त्याला बोलून त्याचा जबाब नोंदवून घेण्यात आला आहे. या प्रकरणामध्ये आम्ही चालकाने दिलेली माहिती पडताळून पाहत आहोत, असं पोलिसांनी म्हटलं आहे. मात्र हा फोन कॉल आल्यानंतर येथील सुरक्षा मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आली असून अनेक ठिकाणी बॅरीकेड्स लावण्यात आले आहेत. या ठिकाणी पोलीस कसून तपास करत आहेत.

याच वर्षी २५ फेब्रुवारी रोजी एक बेवारस स्कॉर्पिओ गाडी अँटिलियाबाहेर आढळून आल्यानंतर चांगलीच खळबळ उडाली होती. त्यानंतर पोलिसांना तपासामध्ये या गाडीत जिलेटीनच्या कांड्या आणि धमकी देणारं एक पत्र मिळालं होतं. तसेच या गाडीत आढलेल्या नकली नंबर प्लेट्सपैकी एक नंबर प्लेट अंबानींच्या मालकीच्या गाडीची होती. नंतर ही गाडी ठाण्यातील मनसुख हिरेन या व्यक्तीची असल्याचं समजलं. मात्र ही व्यक्ती ५ मार्च रोजी ठाण्यातील खाडीमध्ये मृतावस्थेत आढळून आली होती.