मुंबई : ज्येष्ठ उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेली स्फोटके आणि १०० कोटींच्या वसुलीच्या आरोपांनंतर माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि ज्येष्ठ आयपीएस अधिकारी परमबीर सिंह यांच्या मागावर तपास यंत्रणा आहेत. मात्र आता ते गायब असून आता कुठे आहेत, असा सवाल विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे.

अनिल देशमुख राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते असल्यामुळे  ते कुठे आहेत हे पक्षाला माहीत असणे अपेक्षित आहे. त्यामुळे पक्षाने ठावठिकाणा सांगावा. देशमुख मतदारसंघात आहेत, मुंबईत आहेत की इतर ठिकाणी, याचा शोध  सीबीआय, ईडी घेतीलच. सर्व कायदेशीर प्रक्रिया झाल्यानंतर देशमुख यांनी समोर यावे, असे दरेकर यांनी यावेळी सांगितले.

भाजप नगरसेवकाकडून अभियंत्याला शिवीगाळ

मुंबई : भाजपाचे नगरसेवक हरिश भांदिर्गे यांनी पालिकेच्या जल विभागातील अभियंत्याला शिवीगाळ केल्याच्या निषेधार्थ आज (मंगळवारी) कुर्ला पश्चिमेच्या ‘एल’ विभागातील अभियंते आंदोलन करणार आहेत. भांदिर्गे हे कुर्ला पश्चिमेकडील भाजपाचे नगरसेवक आहेत. प्रभाग क्रमांक १६४ मधील संजयनगर, नूरनी मशीद, नवपाडा, सुंदरबाग भागात पिण्याच्या पाण्याची समस्या आहे. या भागातील पाण्याची विक्री करत असल्याचा आरोप करून भांदिर्गे यांनी अभियंत्याला शिवीगाळ केली होती.