अधिकाऱ्यांमध्ये तीव्र पडसाद; कायदा व सुव्यवस्थेबाबत चिंता

ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या जीविताला धोका निर्माण झाल्याने त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच मध्यरात्री दूरध्वनी केल्याचा गौप्यस्फोट झाल्याने त्याचे तीव्र पडसाद ज्येष्ठ आयएएस अधिकाऱ्यांमध्ये उमटले. एखाद्या वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्याने मुख्य सचिव किंवा पोलीस आयुक्तांना दूरध्वनी करण्याऐवजी थेट मुख्यमंत्र्यांशीच संपर्क साधण्याची कार्यपद्धती योग्य आहे का आणि ज्येष्ठ सनदी अधिकाऱ्यांनाच असुरक्षित वाटत असेल, तर ते कायदा व सुव्यवस्थेची स्थिती चांगली नसल्याचेच निदर्शक असल्याचे मत ज्येष्ठ अधिकाऱ्याने ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केले.

ठाण्यात काम करणे अवघड असून अनधिकृत कामे करणाऱ्यांकडून जीविताला धोका असल्याचा दूरध्वनी जयस्वाल यांनी एके दिवशी मध्यरात्री केल्यावर त्यांना पोलीस संरक्षण दिल्याचा गौप्यस्फोट मुख्यमंत्री फडणवीस यांनी शनिवारी केला. त्यावरून नवा वाद निर्माण झाला आहे.

..तर इतरांना कसे संरक्षण देणार?

आयुक्त, जिल्हाधिकारी यांसारख्या अधिकाऱ्यांना सर्वसाधारणपणे पोलीस संरक्षण दिले जाते आणि जीविताला धोका असल्यास ते वाढविले जाते. जयस्वाल यांना अचानक मध्यरात्री कोणी धमक्या दिल्यास थेट मुख्यमंत्र्यांना दूरध्वनी करण्याऐवजी मुख्य सचिव किंवा पोलीस आयुक्त यांना दूरध्वनी का केला नाही, की त्यांच्यावर विश्वास नव्हता? सर्व जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त किंवा शासकीय अधिकाऱ्यांनी हीच ‘पारदर्शी’ कार्यपद्धती स्वीकारणे अपेक्षित आहे का, जयस्वाल यांच्यासारख्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनाच सुरक्षित वाटत नसेल, तर त्यांच्या हाताखाली काम करणाऱ्यांना ते कसे संरक्षण देणार आणि त्यांच्याकडून काम करवून घेणार, असे सवाल उपस्थित झाले आहेत.