राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांचा उत्तराधिकारी कोण असा प्रश्न वारंवार विचारला जात होता. अशातच शरद पवारांनी कार्यकर्ते आणि नेत्यांच्या आग्रहानुसार आपला राजीनाम्याचा निर्णय रद्द केला. यानंतर शुक्रवारी (५ मे) घेतलेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी तुम्ही उत्तराधिकारी निर्माण करण्याची गरज आहे आणि त्यासाठी काम करेन, असं म्हटलं. त्यादृष्टीने काही पदांची निर्मिती होईल का? असा प्रश्न विचारला. यावर शरद पवारांनी त्यांची भूमिका मांडली.

शरद पवार म्हणाले, “उत्तराधिकारी निर्माण करेन ही संकल्पना मी ठरवलेल्या गोष्टींपैकी नाही. मात्र, ही गोष्ट माझ्या मनात जरूर आहे की, संघटनेत काही नवीन सहकाऱ्यांना आणून संधी दिली पाहिजे. याबाबत मी सहकाऱ्यांशी चर्चा करेन.”

“नवीन सहकाऱ्यांना प्रोत्साहित करून संधी देणार”

“काही लोक १०-१५ वर्षे जिल्हास्तरावर काम करतात आणि ते राज्यपातळीवरही काम करू शकतात ही क्षमता त्यांच्यात आहे हे आम्हाला माहिती आहे. तसेच राज्यस्तरावर अनेक वर्षे काम करणारे लोक आहेत जे राष्ट्रीय पातळीवरही काम करू शकतात. त्यांना प्रोत्साहित करणं आणि संधी देणं ही जबाबदारी माझी आणि माझ्या वरिष्ठ सहकाऱ्यांची आहे. आम्ही ही जबाबदारी हळूहळू पार पाडणार आहोत,” असं मत शरद पवार यांनी व्यक्त केलं.

हेही वाचा : शरद पवार यांनी तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेसचं अध्यक्ष केलं तर होणार का? अजित पवार स्पष्टच म्हणाले…

“निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर तीव्र भावना उमटल्या”

राजीनाम्यावर बोलताना शरद पवार म्हणाले, “मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर तीव्र भावना उमटल्या. तसेच मी निर्णयाचा पुनर्विचार करावा म्हणून माझे हितचिंतक, माझ्यावर प्रेम आणि विश्वास असणारे कार्यकर्ते, असंख्य चाहते यांनी संघटीत होऊन एकमुखाने आवाहन केलं.”

“हेच माझ्या परीने प्रदीर्घ सार्वजनिक जीवनाचे गमक”

“देशभरातून विशेषत: महाराष्ट्रातून विविध राजकीय पक्षाचे नेते आणि सहकारी, मी अध्यक्षपदाची जबाबदारी पुन्हा घ्यावी, अशी विनंती केली. लोक माझे सांगाती, हेच माझ्या परीने प्रदीर्घ सार्वजनिक जीवनाचे गमक आहे, माझ्याकडून आपल्या भावनाचा अनादर होऊ शकत नाही. आपण दर्शवलेले प्रेम आणि विश्वास यामुळे मी भारवून गेलो आहे,” असं मत शरद पवार यांनी व्यक्त केलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“…म्हणून मी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय मागे घेत आहे”

“माझ्या निर्णयापासून परावृत्त होण्यासाठी आपण सर्वांनी केलेली आवाहनं आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांच्या बैठकीत त्यांनी घेतलेला निर्णय याचा विचार करून मी पुन्हा अध्यक्षपदी रहावे या निर्णयाचा मान राखून राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय मागे घेत आहे,” असंही शरद पवारांनी नमूद केलं.