scorecardresearch

पवारांची भाजपबद्दल मवाळ भूमिका

केंद्रात सत्तेतील भाजप सरकारबद्दल शरद पवार हे मवाळ भूमिका घेतात

पवारांची भाजपबद्दल मवाळ भूमिका
बिहारची जनता विचाराने श्रीमंत आहे.

मुख्यमंत्र्यांच्या विरोधात मात्र आक्रमक; शेतकऱ्यांना दिलासा मिळाला नाही तर सरकारविरोधात पुन्हा आंदोलन

केंद्रात सत्तेतील भाजप सरकारबद्दल शरद पवार हे मवाळ भूमिका घेतात, अशी त्यांच्यावर नेहमी टीका केली जाते. पण त्याच वेळी राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारवर टीका करण्याची संधी पवार सोडत नाहीत. दुष्काळी परिस्थिती हाताळण्यात फडणवीस सरकारला अपयश आल्याचा ठपका ठेवून सरकारच्या विरोधात पुन्हा आंदोलनाचा इशारा दिला आहे.
राज्यात दुष्काळी परिस्थिती फारच गंभीर आहे. पण सरकारकडून शेतकऱ्यांना मदत मिळत नाही, असा अनुभव जिल्ह्य़ांमधून आलेल्या अहवालांवरून आला आहे. दुष्काळाची गंभीरता आपण जून महिन्यातच मुख्यमंत्री फडणवीस यांच्या निदर्शनास आणून दिली होती, पण सरकारकडून योग्य कृती झाली नाही. शेवटी राष्ट्रवादीच्या वतीने मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रात आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात सुमारे सहा लाख शेतकरी सहभागी झाले होते. यावरून शेतकरी वर्गात सरकार किंवा भाजपबद्दल नाराजी असल्याचे स्पष्ट होते, असे पवार यांनी पत्रकार परिषदेत निदर्शनास आणून दिले. दुष्काळी परिस्थिती हाताळण्याकरिता कोणते उपाय योजले पाहिजेत यासाठी आपण मुख्यमंत्र्यांना पुन्हा एकदा निवेदन दिले आहे. त्यावर ते काय कृती करतात याची वाट बघू. अन्यथा पुन्हा राष्ट्रवादीला आंदोलन करावे लागेल, असा इशाराही पवार यांनी दिला.
मराठवाडय़ातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्याला प्राधान्य देण्याची आवश्यकता आहे. विरोधात असताना भाजपची मंडळी कापूस, सोयाबिनच्या भावासाठी आग्रही असायचे, पण आता सत्तेत गेल्यावर त्यांची भूमिका बदललेली दिसते, याकडे पवार यांनी लक्ष वेधले. पीक विम्याची नुकसानीची रक्कम शेतकऱ्यांना मिळत नसून, शेतकऱ्यांना पैशांसाठी चकरा मारायला लागत आहेत, असेही त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री फडणवीस यांचा राष्ट्रवादी विरोध लपून राहिलेला नाही. भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या मागे चौकशीचे शुक्लकाष्ठ मुख्यमंत्र्यांनी लावून दिल्याने राष्ट्रवादीमध्ये फडणवीस यांच्या विरोधात नाराजी आहे. गेल्याच आठवडय़ात नागपूरमधील कायदा आणि सुव्यवस्थेबद्दल नितीन गडकरी यांनी व्यक्त केलेली चिंता, यापाठोपाठ शरद पवार यांनी डागलेली तोफ यामागे काही योगायोग आहे का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

शनिवारी जेटली बारामतीत
दिल्लीत शरद पवार हे भाजपशी जुळवून घेतात, असा सूर आहे. संसदेत भाजपला अनुकूल अशी भूमिका राष्ट्रवादीने घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बारामतीचा दौरा केला. शनिवारी अर्थमंत्री अरुण जेटली बारामतीमध्ये येत आहेत. भाजप आणि राष्ट्रवादीच्या वाढत्या जवळिकीबद्दल नेहमीच चर्चा होत असते. काँग्रेसने तर उघडउघड तसा आरोप केला आहे. असे असले तरी राज्यात फडणवीस सरकारवर टीकाटिप्पणी करण्याची संधी पवार सोडत नाहीत.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 17-10-2015 at 04:31 IST

संबंधित बातम्या