जागावाटपावरून काँग्रेस-राष्ट्रवादीत अद्यापही धुसफूस सुरू असली तरीही राष्ट्रवादीने गेल्या वेळी लढविलेल्या २२ मतदारसंघांचा आढावा पक्षाध्यक्ष शरद पवार हे रविवार आणि सोमवार असे दोन दिवस घेणार आहेत.
जागावाटपावरून अद्याप दोन्ही काँग्रेसमध्ये एकमत झालेले नाही. गेल्याच आठवडय़ात नवी दिल्लीत पक्षनेत्यांबरोबर झालेल्या बैठकीत राष्ट्रवादीला १९ किंवा २० पेक्षा जास्त जागा सोडण्यास मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी विरोध दर्शविला होता, तर गेल्या वेळी लढलेल्या २२ जागाच राष्ट्रवादी लढविणार असल्याचा पुनरुच्चार पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी केला आहे. ही पाश्र्वभूमी असतानाच शरद पवार रविवार आणि सोमवार असे दोन दिवस मुंबईत पक्षाच्या नेत्यांबरोबर संवाद साधणार आहेत. २२ मतदारसंघांतील प्रमुख नेते आणि लोकप्रतिनिधींबरोबर चर्चा करून उमेदवारांबाबत चर्चा करण्यात येणार आहे. शक्यतो या महिनाअखेर काही उमेदवारांच्या नावांची घोषणा केली जाणार आहे.  हातकणंगले मतदारसंघातून लढण्यास ग्रामीण विकासमंत्री जयंत पाटील फारसे उत्सुक नसले तरी त्यांनाच उतरविले जाण्याची शक्यता आहे. तसे संकेत प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांनी अलीकडेच सांगलीत दिले. छगन भुजबळ यांना नाशिकमध्ये रिंगणात उतरविले जाईल. स्वत: शरद पवार लोकसभा लढणार नाहीत.