लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवाचे खापर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर फोडण्यात येत असून, लवकरच मुख्यमंत्री बदलण्यात येणार आहे, या चर्चेला आता वेग आला आहे. मात्र महाराष्ट्रात नेतृत्वबदल करण्याबाबत सुरू झालेल्या हालचालींमागे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची खेळी असल्याची माहिती समोर आली आहे. पवार यांचीच यामागे मुख्य भूमिका असून राज्यातील काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकार आणि राष्ट्रवादीच्या पक्षसंघटनेवर पूर्ण नियंत्रण मिळवण्यासाठी पवार अशा प्रकारची खेळी करत असून, त्यासाठी त्यांनी दबावतंत्राचा वापर सुरू केल्याचे समजते.
यापूर्वी पवारांनी ‘सरकारच्या हाताला लकवा मारला असावा,’ असे विधान करत मुख्यमंत्री चव्हाण यांच्या कारभारावर टीकास्त्र सोडले होते. अजूनही राष्ट्रवादीसाठी राजकीयदृष्टय़ा महत्त्वाचे असलेले निर्णय मुख्यमंत्री घेत नाहीत, टाळाटाळ करतात. त्यामुळे पवार नाराज झाले आहेत.
या पाश्र्वभूमीवर पवारांनी ए. के. अँटनी यांच्या मध्यस्थीने काँग्रेस नेतृत्वाशी संपर्क साधून राज्यात मुख्यमंत्री बदलण्याचा आग्रह धरला आहे. दरम्यान, राज्यातील नेतृत्वबदलासाठी काँग्रेसचे निरीक्षक दिल्लीहून येणार असल्याची चर्चा सुरू असली तरी लोकसभा निवडणुकीतील पराभवाचा आढावा घेण्यासाठी सोमवारी अँटनी समितीसमोर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांना पाचारण केले आहे.
नाराजीचे कारण
राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पक्षातील वाढलेले महत्त्व ही शरद पवारांसाठी डोकेदुखी झाली आहे. अजित पवारांवर अप्रत्यक्ष नियंत्रण आणण्यासाठी आपल्या विश्वासातील मुख्यमंत्री असावा, अशी पवारांची खेळी आहे. निवडणुकीआधी पुढच्या दोन महिन्यांत पवारांना अपेक्षित असलेली कामे मार्गी लागावीत म्हणूनच मुख्यमंत्री बदलाची मागणी राष्ट्रवादीकडून रेटली जात आहे.