२६/११च्या मुंबई हल्ल्याचा भीषण थरार अनुभवणारा आणि या हल्ल्यात जखमी झालेल्या शेरू या श्वानाने शनिवारी जगाचा निरोप घेतला. परळच्या पशुवैद्यकीय रुग्णालयात त्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. हल्ल्यात गोळ्या लागून जखमी झालेल्या शेरूवर तेव्हापासून रुग्णालयात उपचार सुरू होते.
 सीएसटी स्थानकात दहशतवादी अजमल कसाबने बेछूट गोळीबार करत अनेकांचे प्राण घेतले होते. त्या वेळी रेल्वे स्थानकात शेरूसुद्धा होता. कसाबने झाडलेल्या तीन गोळ्या शेरूला लागल्या आणि जखमी होऊन तो तिथे विव्हळत पडला होता. त्याला श्रीपाद नाईक या छायाचित्रकाराने परळच्या पशुवैद्यकीय रुग्णालयात दाखल केले होते. डॉक्टरांनी त्याच्या शरीरातील दोन गोळ्या काढल्या होत्या; परंतु श्वसननलिकेत एक गोळी अडकली होती. शेरूची माहिती मिळताच एका पारशी कुटुंबाने त्याला दत्तक घेतले. त्याचा दर महिन्याचा रुग्णालयातील खर्च हे कुटुंब करत होते. गेल्या काही दिवसांपासून त्याची प्रकृती खालावली होती आणि त्याने अन्न सोडले होते. शनिवारी हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाला. भावपूर्ण वातावरणात रुग्णालयाच्या आवारात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sheru 2611 hero dies
First published on: 21-12-2014 at 06:52 IST