मुंबई : शिवभोजन थाळी सुरूच राहणार, ती बंद होणार नाही. मात्र प्रत्येक जिल्ह्यात या योजनेचा पालकमंत्र्यांकडून आढावा घेतला जाईल. चौकशीनंतर योग्य निर्णय घेतला जाईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी सांगितले. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सत्तेवर आल्यावर लगेच शिवभोजन थाळी योजना सुरू करण्यात आली होती. शिवभोजन योजनेत काही गैरप्रकार होत असून त्याची चौकशी करण्याच्या सूचना अन्न व नागरी पुरवठा मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिल्या आहेत. त्यामुळे ही योजना बंद होणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारच्या बैठकीत यासंदर्भात चर्चा झाली आणि तूर्तास ही योजना सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

गिरीश महाजनांचे प्रकरण सीबीआयकडे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ज्येष्ठ भाजप नेते गिरीश महाजन व अन्य भाजप नेत्यांना खोटय़ा गुन्ह्यांमध्ये अडकविण्याच्या प्रकरणी केंद्रीय गुप्तचर विभागाकडून चौकशी करण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. महाजन यांच्याविरुद्ध काही आरोप करून गुन्हा नोंदविण्यात आला होता. त्यांना कसे खोटय़ा गुन्ह्यात अडकविण्यात येत आहे, त्याबाबत काही ध्वनिचित्रमुद्रणाची सीडी फडणवीस यांनी विरोधी पक्षनेते असताना विधानसभेत सादर केली होती. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपविण्यात आली होती. आता ती सीबीआयकडे देण्यात आली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारच्या काळात भाजप नेत्यांना कसे खोटय़ा गुन्ह्यात अडकविण्यात येत होते, याची चौकशी सीबीआय करेल व सत्य उजेडात येईल, असे फडणवीस यांनी नमूद केले.