पुढील काही दिवसात भाजपाचे साडेतीन लोक अनिल देशमुखांच्याच कोठडीत असतील आणि अनिल देशमुख बाहेर असतील, असं म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपाला आव्हान दिलं आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करुन महाराष्ट्रातील सरकार पाडण्याचे प्रयत्न केला जात असल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. या पत्रकार परिषदेतून संजय राऊत यांनी भाजपाच्या नेत्यांवर घोटाळ्याचे आरोप करत इशारा दिला आहे. संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेनंतर भाजपामधून प्रतिक्रिया देण्यात येत आहेत.
भाजपा आमदार नितेश राणे यांनी संजय राऊत पत्रकार परिषदेवर प्रतिक्रिया देताना एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये एक महिला शिवसैनिक संजय राऊत यांना धडा शिकवल्या शिवाय राहणार नाही, असे म्हणताना दिसत आहे. यावरुन आता नितेश राणेंनी हा व्हिडीओ पोस्ट करत संजय राऊतांवर निशाणा साधला आहे.
या व्हिडीओमध्ये “तमाम शिवसैनिक आज शिवसेना भवनावर येणार आहेत. केंद्रातील भाजपा सरकारकडून ईडी आणि सीबीआयच्या माध्यमातून दबावतंत्र चालू आहे. त्याला आळा घालण्यासाठी शिवसैनिक हा रस्त्यावर उतरला आहे. माननीय संजय राऊत यांना धडा शिकवल्या शिवाय राहणार नाही,” असे शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्या म्हणताना दिसत आहेत. हा व्हिडीओ ट्विट करत नितेश राणे यांनी ताईंचा मास्टरस्ट्रोक असे म्हटले आहे.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिवसेना भवनात घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये भाजपा नेते किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. पीएमसी बँक घोटाळा प्रकरणातील मुख्य आरोपी राकेश वाधवानशी किरीट सोमय्यांचे संबंध असल्याचा आरोप संजय राऊतांनी केला.
“पीएमसी बँक घोटाळ्याचा सोमय्यांकडून पुन्हा पुन्हा उल्लेख केला. त्यातला मुख्य आरोपी राकेश वाधवानशी आमचे संबंध असल्याचे सांगितले. राकेश वाधवानच्या खात्यातून भाजपाच्या खात्यात वीस कोटी गेले, पक्ष निधीच्या नावावर. मला सांगा निकॉन इन्फ्रा कंपनी कोणाची आहे? ती किरीट सोमय्यांची आहे. किरीट सोमय्या राकेश वाधवानचे भागीदार आहेत. किरीट सोमय्यांनी हजारो कोटींचा प्रकल्प उभारला आहे. पीएमसी बँक घोटाळ्यात सोमय्यांनी ब्लॅकमेल करून कॅश आणि दुसऱ्याच्या नावावर जमीन घेतली. वसईत लाडानीच्या नावावर ही चारशे कोटींची जमीन फक्त साडेचार कोटीला घेतली. निकॉन फेजला पर्यावरण विभागाची मंजुरी नाही. राष्ट्रीय हरित लवादाने कारवाई केली तर दोनशे कोटी रुपयांचा दंड होईल. माझे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आवाहन आहे की त्यांनी या प्रकरणात लक्ष घालावे. तसेच पीएमसी बॅंक घोटाळ्यामध्ये किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांना अटक करण्यात यावी,” असे संजय राऊत म्हणाले.