आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि भाजपमध्ये निर्माण झालेल्या तणावाचे प्रत्यक्ष पडसाद आज मुंबईत उमटताना दिसले. बोरिवली येथील भगवती रूग्णालयाच्या इमारत उद्घाटन सोहळ्यात शिवसेना-भाजपचे कार्यकर्ते आमनेसामने आले. यावेळी दोन्ही बाजूंकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी कार्यकर्ते केवळ एकमेकांना भिडायचे बाकी राहिले होते. या कार्यक्रमाला भाजपचे खासदार गोपाळ शेट्टी, आमदार मनिषा चौधरी, तर महापौर स्न्नेहल आंबेकर, शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे देखील उपस्थित होते. मात्र, दोन्ही बाजुंच्या एकाही नेत्याने घोषणाबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांना आवरण्याचा प्रयत्नही केला नाही. यावरून दोन्ही पक्षांमध्ये एकमेकांविषयी असलेली तिरस्काराची भावना स्पष्टपणे दिसून आली.
‘सामना’ जाळण्याची भाषा करणारे मनोरुग्ण, शिवसेनेचे भाजपवर टीकास्त्र 
गेल्या काही दिवसांत शिवसेना आणि भाजप दोन्ही पक्षांच्या मुखपत्रांतून एकमेकांवर टीकेचे बाण सोडण्यात आले होते. भाजप प्रवक्ते माधव भंडारी यांनी ‘मनोगत’ या भाजपच्या पाक्षिकातून उद्धव ठाकरेंवर टीका करताना त्यांची तुलना ‘शोले’मधील असरानीबरोबर केली होती. त्यामुळे शिवसैनिकांचा संताप शिगेला पोहचला होता. त्यानंतर शिवसैनिकांकडून ‘मनोगत’ व भंडारी यांच्या प्रतिमांचे दहन करण्यात आले होते. या जाळपोळीला योग्य ते प्रत्युत्तर देण्यात येईल, असा इशारा मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी दिला होता. त्यामुळे वातावरण आणखीनच तापले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv sena and bjp supporters clashing in mumbai
First published on: 27-06-2016 at 16:44 IST