सरकारी भूखंड लाटून साखर कारखाने आणि शैक्षणिक संस्था न उभारता शिवसेनाप्रमुखांनी मराठी माणसाच्या पिढय़ा उभ्या केल्या आहेत, असे प्रतिपादन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. शिवसेनेच्या सुवर्ण महोत्सवी वाटचालीचा आढावा घेणारे डॉ. विजय ढवळे लिखित आणि ‘नवचतन्य प्रकाशन’तर्फे प्रकाशित ‘वाघाचे पंजे’ या ग्रंथाचे प्रकाशन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर शिवसेना पक्ष पुढे कसा चालणार, असा प्रश्न नेहमीच माझ्या कानावर येत असतो. अशा लोकांना सांगितले पाहिजे, बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसांच्या मनात जी आग पेटवली आहे. त्या मराठी माणसाला कोणाच्याही नेतृत्वाची गरज नाही. जोपर्यंत ही आग पेटत आहे तोपर्यंत शिवसेना पक्ष कधीच संपणार नाही, असे ते पुढे म्हणाले. बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर उद्धव ठाकरे यांनी शिवसेना त्यांच्यापेक्षा एक पाऊल पुढे नेली अशी स्तुतिसुमने ज्येष्ठ शिवसेना नेते मनोहर जोशी यांनी या वेळी उद्धव ठाकरे यांच्यावर उधळली. ज्यांना सुखी व्हायचे असेल तर त्यांनी शिवसेनेत दाखल व्हावे, असा सल्लाही त्यांनी दिला.