शेतकरी आंदोलनावरून मंत्रिमंडळ बैठकीकडे सेनेची पाठ; भाजपकडून खिल्ली!

शेतकरी कर्जमाफीवरून आक्रमक असल्याचे दाखविण्यासाठी शिवसेनेच्या मंत्र्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनंतर मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकला. मात्र हा बहिष्कार नसून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या परवानगीने सेनेचे मंत्री गैरहजर राहिल्याचे सांगत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बहिष्काराची हवा काढून घेतली. नंतर शिवसेना मंत्रांनीदेखील गुळमुळीत पवित्रा घेतला, तर भाजपच्या मंत्र्यांनी या प्रकारावरून सेनेच्या मंत्र्यांची जोरदार खिल्ली उडविली. मंत्रिमंडळ बैठकीत सेनेचे मंत्री ‘हम साथ साथ है’ म्हणतात, आणि बाहेर मात्र, ‘हम आपके है कौन’ पवित्रा घेतात, अशा शब्दांत एका ज्येष्ठ मंत्र्याने सेनेच्या बहिष्कारास्त्रावर टीका केली.

सेनेचा ‘बहिष्कार’ नव्हे, तर मुख्यमंत्र्यांची पूर्वसंमती घेऊन सेनेचे मंत्री ‘गैरहजर’ होते, असे भाजपचे मंत्री ठणकावून सांगत असताना खासदार संजय राऊत मात्र बहिष्काराच्या मुद्दय़ावर ठाम होते. हा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार घातलेला बहिष्कारच होता, असे त्यांनी स्पष्ट केले. सेनेचे मंत्री परवानगी मागायला नव्हे तर भूमिका मांडण्यासाठीच मुख्यमंत्र्यांकडे गेले होते, आणि मंत्रिमंडळ बैठकीवर आमचा बहिष्कारच होता, असे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी स्पष्ट केले. दरम्यान, बहिष्कार की गैरहजेरी यांवरून शिवसेनेवर टीकेची झोड सुरू असली तरी शेतकरी आंदोलनाच्या मुद्दय़ावरून सेना-भाजपमधील दरी अधिक रुंदावल्याचे मात्र यामुळे स्पष्ट झाले आहे. मुख्यमंत्री फडणवीस हे शिवसेनेला डावलत असल्याची भावना सेनेच्या मंत्र्यांनी बोलूनही दाखविल्याने आता उद्धव ठाकरे यांच्याशीच मुख्यमंत्र्यांनी चर्चा करावी, असा पवित्रा सेनेने घेतला आहे.राज्यात शेतकरी आंदोलन भडकलेले असतानाच ठाकरे लंडनच्या दौऱ्यावर असल्याने ते तेथून परतल्यावर मुख्यमंत्री फडणवीस व ठाकरे यांची कर्जमाफीच्या मुद्दय़ावर बैठक होण्याची शक्यता आहे. शेतकरी संपाला शिवसेनेचा कायम पाठिंबा असून सरसकट संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे, अशी शिवसेनेचीही मागणी आहे.

नक्की काय झाले?

मुख्यमंत्री शिवसेनेला फारशी किंमत देत नसल्याने उद्धव ठाकरे नाराज असून त्यांनी लंडनहून शिवसेना मंत्र्यांना मंत्रिमंडळ बैठकीस हजर न राहण्याच्या सूचना दिल्या. पण शिवसेनेच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या संपाला शिवसेनेचा पाठिंबा असून ठाकरे यांच्याशी चर्चेनंतर पुढील भूमिका घेऊ आणि त्यामुळे बैठकीस हजर राहू शकत नाही, असे सांगितले.

संपाचा प्रभाव ओसरला

शेतकरी संपाचा प्रभाव ओसरला असून बाजार समित्यांमध्ये फळे, भाजीपाला व अन्य शेतीमालाची आवक नियमितपणे सुरू झाल्याने त्यांचे दर उतरले आहेत. शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीची बैठक गुरुवारी नाशिकला होत असून त्यानंतर आंदोलन तीव्र करण्यात येणार आहे. मात्र दूध, फळे, भाजीपाला व अन्य शेतीमालाची आवक सुरळीत ठेवून संप मोडून काढण्याची सरकारची रणनीती आहे. शेतकऱ्यांच्या आडून राजकारण करणाऱ्यांना तोंड देण्यासाठी संपाकडे दुर्लक्ष करण्याची भूमिका फडणवीस यांनी घेतली आहे.