आमदार विनोद घोसाळकर यांनी चालविलेल्या मानसिक छळाविरोधात उठवलेल्या आवाजात सर्वपक्षीय महिला नगरसेविकांनी सूर मिसळूनही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दाद देत नसल्याने कंटाळलेल्या शिवसेना नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी बुधवारी नगरसेवकपदाचा राजीनामा दिल्याने शिवसेनेला हादरा बसला आहे. घोसाळकर यांनी आपल्या घरावर मोर्चा पाठविल्याचे समजताच म्हात्रे संतप्त झाल्या आणि रक्तदाबाचा त्रास होऊन त्या खाली कोसळल्या. रुग्णालयातच त्यांनी पत्रकारांसमोर राजीनाम्याची घोषणा केली. दहिसरमधील एम. एम. रुग्णालयातील अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
गेल्या काही महिन्यांपासून घोसाळकर आणि म्हात्रे यांच्यात खटके उडत होते. त्यातच म्हात्रे यांचा मोबाइल क्रमांक सार्वजनिक प्रसाधनगृहात लिहिला गेल्याने त्यांना अश्लील दूरध्वनी येऊ लागले होते. पोलिसांनी शोध घेऊन हे क्रमांक खोडूनही टाकले. मात्र नंतर दहिसरमधील प्रसाधनगृहात त्यांचा मोबाइल क्रमांक लिहून ठेवण्यात आल्याने अश्लील दूरध्वनीचा त्रास सुरूच होता. यामागे घोसाळकरांचा हात असल्याचा संशय त्यांना होता. याबाबत त्यांनी उद्धव ठाकरे, त्यांचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्याकडे तक्रारही केली. परंतु आजतागायत उद्धव ठाकरे यांनी त्यांना भेट दिली नाही.
आमदार घोसाळकर यांच्या विकृत वर्तनामुळे प्रचंड मानसिक त्रास झाला आहे. आपल्या सहकाऱ्यांना त्रास होऊ नये आणि शिवसेनेत दुफळी निर्माण होऊ नये यासाठी मी नगरसेवकपदाचा राजीनामा देत आहे.                – शीतल म्हात्रे