शिवसेनेच्या ‘व्हिजन डॉक्युमेंट’ या महत्वकांक्षी प्रकल्पातील पुढच्या टप्प्याचे प्रात्यक्षिक रविवारी शिवसेना भवनात पत्रकारांसमोर सादर करण्यात आले. शिवसेनेकडून टेलि-मेडिसीन या संकल्पनेतंर्गत ‘शिव आरोग्य सेवा’ पुरविण्यात येणार आहे. या सेवेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील जनतेला तंत्रज्ञानाच्या सहाय्याने वैद्यकीय सेवा पुरविण्यात येणार आहे. सॅटेलाईट तंत्रज्ञानाच्या सहाय्याने निवडक केंद्रांवर खेड्यापाड्यातील रूग्णांना चांगल्या प्रतीची आरोग्य सुविधा मिळणे शक्य होणार असल्याचे, यावेळी उद्धव ठाकरे यांनी सांगितले. सध्याच्या घडीला महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रांची अवस्था बिकट असून, टेलि-मेडिसीन या संकल्पनेमुळे ग्रामीण भागातील जनतेला आरोग्याच्या उत्तम सुविधा, नामवंत डॉक्टरांकडून उपचार करून घेणे शक्य होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी शिवसेना भवनात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून खेड्यातील जनतेला कशाप्रकारे सुविधा देण्यात येईल याचे प्रात्यक्षिकदेखील सादर करण्यात आले. सुरूवातीला चंद्रपूर आणि डहाणुमध्ये प्रायोगिक तत्वावर ही सेवा राबविण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. 
एक पक्ष म्हणून राज्यपातळीवर अशाप्रकारच्या योजना अंमलात आणण्यास मर्यादा येतात. त्यामुळे विधानसभा निवडणुकांनंतर महायुती सत्तेत आल्यास, ‘शिव आरोग्य सेवा’ राज्याच्या विविध भागात व्यापक प्रमाणात राबविण्यात असे आश्वासन यावेळी उद्धव यांनी दिले.