काहीही करून सत्तेत सहभागी व्हावे, असा दबाव शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर वाढत असून अन्यथा ‘गृहकलह’ निर्माण होण्याची शक्यता आहे. सत्तेत न गेल्यास केवळ आमदारांची फाटाफूट होणार नसून आपले ‘घर’ सांभाळण्यासाठी ठाकरे यांना कसरत करावी लागणार आहे. आपली ‘गृह’दशा ठीक राहावी, यासाठी उपमुख्यमंत्रिपद तर सोडाच, पण ‘गृह’ खात्याचा आग्रहही सोडून देण्याची भूमिका शिवसेना घेण्याची चिन्हे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे शिवसेनेचा सत्तेतील सहभाग सुकर झाला आहे.
शिवसेनेशी सूत जुळविण्यासाठी गेला महिनाभर सुरू असलेले भाजपचे प्रयत्न यशस्वी झाले नाहीत. शिवसेनेने आडमुठी भूमिका घेत उपमुख्यमंत्रिपद व एक तृतीयांश मंत्रिपदांचा आग्रह धरला. पण कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेच्या अटी मानणार नाही, प्रसंगी सरकार पडले तरी चालेल, अशी भाजपची खंबीर भूमिका आहे. तसेच उपमुख्यमंत्रिपद व गृहखाते देण्याची भाजपची तयारी नाही. राष्ट्रवादी काँग्रेसने विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी गैरहजर राहून किंवा सभागृहात तटस्थ राहून भाजपला मदत करण्याची भूमिका जाहीर केली होती. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवून सत्तेत आलो आणि ती सत्ता टिकविण्यासाठी त्यांची मदत घेण्यात भाजपला अडचण वाटत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचाही राष्ट्रवादी काँग्रेसची मदत घेण्यापेक्षा शिवसेनेला बरोबर घेण्याचा आग्रह आहे.
त्याचबरोबर गेली १५ वर्षे सत्तेपासून दूर राहिल्याने आता काहीही करून सत्तेत सहभागी होण्याचा ‘अंतर्गत’ आग्रह ठाकरे यांना होत आहे. शिवसेनेचे काही आमदार भाजपबरोबर जातील, अशी भीतीही आहेच. त्यामुळे हे लक्षात घेऊन आणि आपले घर सांभाळण्यासाठी गृह खात्याचा आग्रहही सोडून देऊन मिळतील ती खाती पदरात पाडून घेण्यास ठाकरे होकार देण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले.
आतापर्यंत शिवसेनेच्या आडमुठय़ा भूमिकेमुळे बरीच टीका झाली. आता राष्ट्रवादी काँग्रेसने सरकार टिकविणे ही केवळ आमची जबाबदारी नाही, ही भूमिका घेतल्याने त्याचा राजकीय फायदा उठविण्याची खेळी केली जाणार आहे. त्यानिमित्ताने सरकार टिकविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा अप्रत्यक्ष उपयोग करून घेतला जात होता. त्याऐवजी राष्ट्रवादी काँग्रेसला बाजूला सारून शिवसेनेचा सत्तेतील सहभागाचा मार्ग सुकर करण्यात येत आहे.
संग्रहित लेख, दिनांक 19th Nov 2014 रोजी प्रकाशित
सेना सत्तेच्या दिशेने!
काहीही करून सत्तेत सहभागी व्हावे, असा दबाव शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर वाढत असून अन्यथा ‘गृहकलह’ निर्माण होण्याची शक्यता आहे. सत्तेत न गेल्यास केवळ आमदारांची फाटाफूट होणार नसून आपले ‘घर’ सांभाळण्यासाठी ठाकरे यांना कसरत करावी लागणार आहे.

First published on: 19-11-2014 at 02:34 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv sena looking towards power in maharashtra