मुंबई महानगर क्षेत्रातील रेल्वेच्या समस्या जाणून त्याची सोडवणूक करण्यासाठी शनिवारी सहय़ाद्री अतिथिगृहात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीला झालेल्या भाजप कार्यकर्त्यांच्या भाऊगर्दीत खुद्द रेल्वेमंत्रीच हरवून गेले. त्यामुळे बैठकीसाठी आलेल्या खासदार, आमदार आणि अधिकाऱ्यावरही मंत्र्याचा भाजप दरबार पाहात ताटकळण्यावाचून पर्याय उरला नाही. शेवटी मुंबईच्या समस्यांची उभ्या उभ्याच चर्चा झाली, त्यामुळे संतप्त झालेल्या शिवसेना खासदारांनी बैठकीवर बहिष्कार टाकीत नाराजी व्यक्त केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई आणि परिसरातील रेल्वे समस्या जाणून घेऊन त्याची सोडवणूक करण्यासाठी रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी आज एक बैठकीचे आयोजन केले होते. मुंबई महानगर क्षेत्रातील सर्व आमदार आणि खासदारांना दुपारी २ ते ४ या वेळेत बैठकीसाठी आमंत्रित केले होते. त्यानुसार मतदारसंघातील रेल्वे स्थानक आणि प्रवाशांना  भेडसावणाऱ्या रेल्वे समस्यांचा अभ्यास करून खासदार आणि आमदार  दुपारी दोन वाजण्यापूर्वीच सहय़ाद्री अतिथिगृहावर दाखल झाले. त्या वेळी सहय़ाद्रीवर कार्यकर्त्यांची  गर्दी होती. बैठकीच्या सभागृहाबाहेर असलेल्या कार्यकर्त्यांच्या गर्दीतून वाट काढत लोकप्रतिनिधी सभागृहात दाखल झाले खरे, मात्र तिथेही कार्यकर्त्यांनीच गोयल यांना घेरले होते. त्यामुळे त्यांचे साधे दर्शनही लोकप्रतिनिधींना मिळेना.  मंत्र्याचे आपल्याकडे लक्ष जाईल आणि ठरलेली  बैठक सुरू होईल या अपेक्षेने तासभर बसूनही काही उपयोग न झाल्याने राहुल शेवाळे, अरविंद सावंत, श्रीकांत शिंदे, राजन विचारे आदी शिवसेना खासदारांनी तसेच काही आमदारांनी उभ्या उभ्याच मंत्र्यांच्या हातात निवेदन टेकवीत बैठकीतूनच काढता पाय घेतला. तर विद्या चव्हाण, राहुल नार्वेकर, कालिदास कोळंबकर हे ताटकळत बसले होते. यात अडचण झाली ती भाजप खासदारांची. सेना खासदारांनी बैठकीस रामराम केला; मात्र आपल्याच पक्षाचे मंत्री असल्याने गोपाळ शेट्टी, कपिल पाटील, पूनम महाजन आदी खासदार आणि राज पुरोहित, भाई गिरकर आदी आमदारांना ताटकळत उभे राहावे लागले.

शिवसेनेचे टीकास्त्र

रेल्वेमंत्र्यांना मात्र खासदार, आमदार आणि मुंबईकरांच्या प्रश्नापेक्षा कार्यकर्त्यांचे प्रश्न महत्त्वाचे वाटले असावेत. त्यामुळेच आजची बैठक निव्वळ फार्स ठरली, असे खासदार श्रीकांत शिंदे आणि राहुल शेवाळे यांनी सांगितले. तर ‘आजची बैठक चांगली झाली. ती अधिक चांगली होऊ शकली असती, पण कार्यकर्त्यांच्या गर्दीमुळे थोडी अडचण झाली. निवडणुकीमुळे शिवसेना सदस्य आरोप करीत असावेत’ असे खासदार गोपाळ शेट्टी यांनी सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv sena on bjp piyush goyal
First published on: 01-09-2018 at 02:09 IST