सुधार समितीच्या बैठकीत हॉटेलच्या गच्चीवरील पार्टी आणि मंडयांच्या पुनर्विकासाबाबतच्या प्रस्तावात भाजपने साथ सोडल्यामुळे शिवसेनेवर नामुष्की ओढवली. याचा वचपा घेण्यासाठी मुंबईतील पदपथांवर बसविण्यात येणाऱ्या एलईडी दिव्यांचा मुद्दा उपस्थित करून भाजपची कोंडी करण्याचा प्रयत्न शिवसेनेने गुरुवारी पालिका सभागृहात केला. मात्र राष्ट्रीय धोरणानुसार संपूर्ण देशामध्ये बसविण्यात येणाऱ्या एलईडी दिव्यांचे महत्त्व दस्तुरखुद्द पालिका आयुक्तांनीच पटवून दिल्याने भाजपला नमविण्याचा प्रयत्न करणारी शिवसेना निष्प्रभ झाली. तर भाजप नगरसेविका आक्रमक झाल्यामुळे संख्याबळ अधिक असतानाही शिवसेनेवर नामुष्की ओढवली. या सर्व गदारोळात मात्र कालपर्यंत भाजपबरोबर असलेली मनसे गुरुवारी शिवसेनेच्या बाजूने उभी राहिल्याचे चित्र होते.
 शिवसेनेला अंधारात ठेवून मरिन ड्राइव्ह येथे प्रायोगिक तत्त्वावर एलईडी दिवे बसविण्यात आले. मुंबईमध्ये एलईडी दिवे बसविण्याचे कंत्राट ईईएसएल या कंपनीला देण्यात येणार आहे. एलईडी दिव्यांमुळे ‘क्वीन्स नेकलेस’ विद्रूप झाला आहे. मरिन ड्राइव्हवर पूर्वीप्रमाणेच सोडिअम व्हेपरचे दिवे बसवण्याची मागणी शिवसेनेचे अवकाश जाधव यांनी  केली. मरिन ड्राइव्हवरील नागरिकांनीही एलईडी दिव्यांना विरोध केल्याचे बॅनर्स शिवसेनेचे स्थानिक नगरसेवक गणेश सानप यांनी सभागृहात झळकविले. तर एलईडी संदर्भातील चर्चेला भाजप तयार असल्याचे सांगत भाजपचे गटनेते मनोज कोटक यांनी शिवसेना नगरसेवकांच्या आरोपांचे खंडन केले.
भाजपला ‘क्वीन नेकलेस’ माहीत नाही
‘क्वीन नेकलेस’मध्ये एलईडी दिवे बसविल्याने त्याची शोभा गेल्याची टीका सेना नगरसेवक करीत होते. मात्र क्वीन नेकलेस कुठे आहे, हा कोणत्या राणीचा नेकलेस आहे, याची आपल्याला माहिती द्यावी, असे सांगत अज्ञानाचे प्रदर्शन सभागृहात घडविले. भाजप नगरसेवक ज्ञानमूर्ती शर्मा यांनीही त्याची री ओढली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv sena pockets battle on led issue in bmc
First published on: 27-02-2015 at 03:32 IST