सध्या शिवसेनेचे दक्षिण मुंबईचे विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ यांच्या अजानच्या स्पर्धेच्या वक्तव्यावरून राजकारण चांगलंच तापलं आहे. दरम्यान, कोणत्याही धर्मीयांच्या भावनांचा आदर करणे म्हणजे हिंदुत्वाला सोडचिठ्ठी असे होत नाही. बाबरीचे ढाचे कोसळताच ज्यांनी बगला वर केल्या त्यांनी हिंदुत्वाची पोपटपंची करणे हा विनोदच आहे, असं म्हणत शिवसेनेनं भाजपावर जोरदार टीका केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शिवसेनेने ‘अजान’प्रकरणी हिंदुत्वास सोडचिठ्ठी दिल्याचे जे दात उचकटून बोलत आहेत त्यांच्या दाताडांत ‘ईद’च्या शिरकुरम्याची, बिर्याणीची शिते अडकल्याची साग्रसंगीत छायाचित्रेच प्रसिद्ध झाली आहेत. शिवसेनेच्या हिंदुत्वाकडे बोट दाखवताना चार बोटे स्वतःकडेही वळली आहेत याचे भान राखा. स्वतः मतांच्या लांगूलचालनासाठी बांग द्यायची व दुसऱ्यांच्या अजानवर आक्षेप घ्यायचा, असा आरोप शिवसेनेनं केला आहे. शिवसेनेनं सामनाच्या संपादकीयमधून भाजपावर निशाणा साधला.

काय म्हटलंय अग्रलेखात?

भारतीय जनता पक्षाचे बेगडी हिंदुत्व अधूनमधून फसफसत असते. तसे ते आता एका अजान प्रकरणात फसफसताना दिसत आहे. शिवसेनेचे दक्षिण मुंबई विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ यांनी मुस्लिम बांधवांच्या एका स्वयंसेवी संस्थेने आयोजिलेल्या अजान स्पर्धेचे काैतुक केले व सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. सध्या कोविडचा प्रकोप आहे. त्यामुळे धार्मिक उत्सवात गर्दी करू नये हे राष्ट्राचे व राज्याचे संकेत आहेत. दक्षिण मध्य मुंबईतील बहुसंख्य भागात मुस्लिमांची वस्ती आहे. त्यांनीही खाली उतरून गर्दी करू नये. जे काही उपक्रम, उत्सव साजरे करायचे आहेत ते ‘ऑनलाइन’ म्हणजे डिजिटल माध्यमांचा वापर करून करा. शिवसेना याकामी आपल्याला मदत करेल.

हा विषय एवढय़ापुरता आणि इतकाच मर्यादित असताना भाजपच्या तांडवेश्वरांनी हाती माकडी कोलिते घेऊन नाचण्याचा प्रकार सुरू केला. त्यांनी यावर असा अपप्रचार सुरू केला की, ‘पहा, काय सुरू आहे. शिवसेनेने भगवा सोडला, हिंदुत्वाला मूठमाती दिली. शिवसेना मतांसाठी लांगूलचालन करीत आहे. शिवसेनेचे हिंदुत्व तकलादू आहे’. ‘अजान’प्रकरणी शिवसेनेवर अशी चिखलफेक करणे म्हणजे दिल्लीतील सीमेवरील शीख शेतकऱयांना पाकिस्तानी अतिरेकी म्हणण्यासारखेच आहे.

दिल्लीच्या सीमेवर जे शीख शेतकरी बांधव आंदोलनात जमले आहेत त्यातील बहुसंख्य हे पूर्वाश्रमीचे ‘जवान’ आहेत व देशासाठी त्यांनी प्रत्यक्ष रणांगणावर शौर्य गाजवले आहे. यापैकी अनेकांची मुले आजही सीमेवर पाकडय़ांशी लढत आहेत व त्यातील चारजण गेल्या दोनेक दिवसांत शहीद झाल्याचे वृत्त आहे. अशा राष्ट्रभक्तांना जे ‘ट्रोलभैरव’ अतिरेकी किंवा पाकडे म्हणून हिणवतात त्यांच्याकडून दुसरी काय अपेक्षा करणार! बरं, शिवसेनेने ‘अजान’प्रकरणी हिंदुत्वास सोडचिठ्ठी दिल्याचे जे दात उचकटून बोलत आहेत त्यांच्या दाताडांत ‘ईद’च्या शिरकुर्म्याची, बिर्याणीची शिते अडकल्याची साग्रसंगीत छायाचित्रेच प्रसिद्ध झाली आहेत. पंतप्रधान मोदी, केंद्रीय मंत्री गोयल यांचीही काही छायाचित्रे प्रसिद्ध झाली आहेत; पण आम्हाला त्याबाबत बखेडा निर्माण करायचा नाही.

मशिदीवरील भोंगा हा वादग्रस्त विषय आहे. मशिदीवरील भोंग्यामुळे इस्लाम मजबूत होत नाही व याबाबत केंद्र सरकारने एक अध्यादेश काढून हा गोंधळ आणि ध्वनिप्रदूषण थांबवायला हवे. त्याचा हिंदुत्वाशी संबंध जोडला तरी हा विषय ध्वनिप्रदूषण आणि पर्यावरणाशीच निगडित आहे. आज सर्वाधिक भोंगे हे उत्तर प्रदेश, बिहारातील मशिदींवर आहेत. कश्मीर खोऱ्यातून ३७० कलम हटवले तरी या भोंग्यांवरून लोकांना उकसविले जाते. तेसुद्धा रोखायला नको काय?

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv sena saamna editorial criticize bjp over pandurang sakpal azaan competition statement mumbai jud
First published on: 02-12-2020 at 07:44 IST