शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर थेट आरोप करणारे माजी खासदार मोहन रावले यांची सोमवारी शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली. खासदार संजय राऊत यांनी ही घोषणा केली. मोहन रावले मनसेत प्रवेश करतील अशी अटकळ आहे.
गेल्याच आठवडय़ात मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांची रावले यांनी भेट घेतली तेव्हाच त्यांची पावले कोणत्या दिशेने जात आहेत, हे स्पष्ट झाले होते. मनोहर जोशी यांच्यापाठोपाठ मोहन रावले यांनी बंडाचे निशाण फडकविल्याने ‘मला अस्तनीतील निखारे नकोत, जायचे त्यांनी बाहेर जावे’, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला होता. या पाश्र्वभूमीवर शिवसेनेवर हल्ला चढविण्यासाठी रावले यांनी सोमवारी पत्रकार परिषद आयोजित केली होती. ‘चार वर्षांपासून मला उद्धव ठाकरे यांची भेट मिळू शकली नाही. सामान्य कार्यकर्ता बाळासाहेब ठाकरे यांना भेटू शकत होता. मनोहर जोशी यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याने माफी मागणे चुकीचे होते. अस्तनीतला निखारा मी नव्हे तर मिलिंद नार्वेकर आहेत. तेच पक्ष चालवितात. मागे बाळासाहेब ठाकरे यांनीही मिलिंदच्या वर्तणुकीबद्दल संताप व्यक्त केला होता’, असे रावले म्हणाले. रावले यांच्या पत्रकार परिषदेचे थेट प्रक्षेपण सुरू असतानाच संजय राऊत यांनी त्यांच्या हकालपट्टीची घोषणा केली.