लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या घवघवीत यशाच्या पाश्र्वभूमीवर कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्राची सत्ता मिळवायचीच, हे ध्येय शिवसेनेने निश्चित केले असून, शिवसेनेच्या बुधवार १८ जूनपासून सुरू होणाऱ्या राज्यव्यापी शिबिरामध्ये त्यादृष्टीने रणनीती निश्चित केली जाणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांच्या नावाने प्रचार करण्याचा निर्धार या शिबिरात शिवसैनिकांकडून व्यक्त केला जाईल, असे सेनेच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले.
‘माझा महाराष्ट्र-भगवा महाराष्ट्र’ अशी साद घालत होणाऱ्या शिवसेनेच्या या शिबिरात उद्धव ठाकरे यांची महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री म्हणून घोषणा होईल, अशी शिवसैनिकांना अपेक्षा आहे. विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेने जय्यत तयारी सुरू केली असून, या शिबिरात गाव तेथे शाखा, मतदार हक्क अभियान, सदस्य नोंदणी अभियान आणि काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काळ्या कारभाराचे वस्त्रहरण आदींवर वेगवेगळे ठराव केले जाणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर निर्विवाद शिक्कामोर्तब झाले असून, आता पक्षात बंडखोरीचा विचारही कोणी करणार नाही, असे शिवसेनेच्या सूत्रांनी सांगितले. यापूर्वी दिल्लीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही महाराष्ट्रात शिवसेनाच मोठा भाऊ असल्याचे स्पष्ट केले होते. राज्यात सत्ता येत असताना भाजप नेते आता कोणताही करंटेपणा करणार नाहीत, असा विश्वास सेनानेत्यांना आहे. महायुतीच्या घटक पक्षांमध्ये उत्तम समन्वय असून, कोणीही त्यात खोडा घालण्याचा प्रयत्न केला तरी तो यशस्वी होणार नाही, असा विश्वास खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला.