मुंबई : मुंबई पदवीधर मतदारसंघ शिवसेनेच्या ताब्यात असल्याने शिंदे गटाने लढण्याची तयारी सुरू केली असतानाच भाजपचा या मतदारसंघावर डोळा असल्याने भाजप आणि शिंदे गटात या मतदारसंघावरून चढाओढ होण्याची चिन्हे आहेत. दुसरीकडे, शिवसेना ठाकरे गटाकडून माजी मंत्री अनिल परब यांना उमेदवारी दिली जाणार आहे.

मुंबई पदवीधर हा मतदारसंघ पूर्वी भाजपचा बालेकिल्ला होता. पण शिवसेना नेते प्रमोद नवलकर यांनी पदवीधर मतदारसंघातील भाजपचे वर्चस्व मोडून काढले. त्यानंतर गेली ३० वर्षे हा मतदारसंघ शिवसेनेच्या ताब्यात आहे. गेल्या वेळी विलास पोतनीस हे शिवसेनेच्या वतीने निवडून आले होते. शिवसेनेतील फुटीनंतर गेल्या वेळी शिवसेनेने जिंकलेल्या मतदारसंघावर महायुतीत शिवसेना शिंदे गटाचा दावा असतो. यानुसार मुंबई पदवीधर मतदारसंघातून शिंदे गटाने लढण्याची तयारी सुरू केली आहे. मुंबई पदवीधर मतदारसंघाचे दोनदा प्रतिनिधित्व केलेले माजी मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी शिंदे गटातून लढण्याची इच्छा पक्षाकडे व्यक्त केली आहे. पक्षातील फुटीनंतर डॉ. सावंत यांनी शिंदे गटात प्रवेश केला होता. शिवसेनेतील फुटीनंतर भाजपचा मुंबई पदवीधर मतदारसंघावर डोळा आहे. ‘तरुण भारत’ या रा. स्व. संघ परिवाराशी संबंधित वृत्तपत्राचे मुंबईतील संपादक किरण शेलार यांनी पदवीधर मतदारसंघातील निवडणूक लढण्याच्या दृष्टीने तयारी केल्याचे सांगण्यात येते. या मतदारसंघात लढण्यासाठी भाजपने मोठ्या प्रमाणावर मतदारांची नोंदणी केली आहे. उमेदवारीबाबत शेलार यांनी काहीही प्रतिक्रिया व्यक्त करण्यास नकार दिला.

yogendra yadav
“लोकसभेच्या निकालानंतर अजित पवार आणि एकनाथ शिंदे…”, योगेंद्र यादव यांचं मोठं विधान!
Varsha Gaikwad
“मतदानानंतर मला उद्धव ठाकरेंचा फोन आला अन्…”; वर्षा गायकवाड नेमकं काय म्हणाल्या?
Ian Bremmer prashant kishor
भाजपाला किती जागा मिळणार? प्रशांत किशोरांपाठोपाठ अमेरिकन राजकीय संशोधकाने केलं विश्लेषण
Maharashtra Lok Sabha Election Result 2024 Updates in Marathi
Maharashtra Lok Sabha Election Result 2024: महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघात काय आहे स्थिती? कुणाला मिळाला विजय; कोण आघाडीवर? जाणून घ्या…
vishal patil and uddhav thackeray
“उद्धव ठाकरेंना…”, काँग्रेसला पाठिंबा दिल्यानंतर अपक्ष आमदार विशाल पाटलांचं विधान
Yogendra Yadav BJP Win NDA Congress
“मी भाजपाच्या विजयाची भविष्यवाणी…”, योगेंद्र यादव यांनी दिलं स्पष्टीकरण, पुन्हा सांगितलं किती जागा मिळणार
Gajanan Kirtikar Eknath Shinde (1)
“त्यांनी शिंदेंना सलाम ठोकणं मला पटलं नाही”, पत्नीच्या वक्तव्यावर गजानन कीर्तिकर म्हणाले, “माझ्यावर…”
navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत

हेही वाचा >>>मुंबई : बेस्टची ॲप आधारित विमानतळ प्रीमियम सेवा बंद

शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने माजी मंत्री व ‘मातोश्री’चे विश्वासू अनिल परब यांना उमेदवारी निश्चित मानली जाते. परब यांची विधान परिषदेची मुदत येत्या जुलैमध्ये संपत आहे. शिवसेनेतील फुटीमुळे ठाकरे गटाकडे विधानसभेतून विधान परिषदेवर उमेदवार निवडून आणण्याकरिता पुरेशी मते नाहीत. यामुळे अनिल परब यांना पदवीधर मतदारसंघातून निवडून आणण्याची योजना आहे. या जागेसाठी युवासेनेचे वरुण सरदेसाई यांच्या नावाची चर्चा होती. पण बदलत्या परिस्थितीत परब यांना संधी दिली जाणार आहे. मुंबई पदवीधर मतदारसंघात एक ते सव्वा लाख मतदार असतील. पहिल्या यादीत ९२ हजार मतदार पात्र आहेत. दुसरी यादी लवकरच प्रसिद्ध होईल. सव्वा लाखांच्या आसपास मतदारांची संख्या असेल. शिवसेना ठाकरे गटाकडून मोठ्या प्रमाणावर नोंदणी करण्यात आली आहे.

मुंबई पदवीधरची जागा लढण्याबाबत पक्षाच्या सुकाणू समितीच्या बैठकीत चर्चा करून मगच अंतिम निर्णय घेतला जाईल.-आशीष शेलार, मुंबई भाजप अध्यक्ष.

मुंबई पदवीधर हा मतदारसंघ गेली ३० वर्षे शिवसेनेच्या ताब्यात आहे. या वेळी शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणावर मतदारांची नोंदणी केली आहे. या मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटच विजयी होईल.- अनिल परब, शिवसेना ठाकरे गटाचे संभाव्य उमेदवार

मुंबई पदवीधर हा मतदारसंघ पारंपरिकदृष्ट्या शिवसेनेचा मतदारसंघ आहे. यामुळे महायुतीत ही जागा शिवसेनाच (शिंदे गट) लढणार आहे. आपण मी निवडणूक लढण्यासाठी आधीपासून तयारी केली आहे.- डॉ. दीपक सावंत, माजी मंत्री व शिंदे गटातील इच्छुक उमेदवार