सत्तेत असूनही कायम विरोधकांसारखे वर्तन करणाऱ्या शिवसेनेच्या एका कृतीमुळे भाजप-शिवसेना यांच्यात पुन्हा एकदा जुंपणार असल्याचे चित्र आहे. शेतकरी कर्जमाफी आणि आंदोलनासंदर्भात सुरूवातीपासूनच सरकारविरोधी भूमिका घेणाऱ्या शिवसेनेने सोमवारी मुंबईत लावलेल्या फलकांवरून या वादाची ठिणगी पडू शकते. सरकारवर दबाव आणून निर्णय घेण्यास भाग पाडल्यानंतर ज्या थाटात विरोधकांकडून आपल्या यशाची दवंडी पिटली जाते त्याच थाटात शिवसेनेने हे बॅनर्स लावले आहेत. शिवसेनेकडून लावण्यात आलेल्या या बॅनर्सवर कर्जमाफीच्या निर्णयाचे श्रेय पूर्णपणे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना देण्यात आले आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली महाराष्ट्रातील शेतकरी संघटनांच्या लढ्याला अभूतपूर्व यश मिळाले. अखेर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला, असा मजकूर या बॅनर्सवर छापण्यात आला आहे. मुंबईसह भाजपचे मुख्यालय असलेल्या परिसरात हे बॅनर्स लावण्यात आले आहेत. त्यामुळे आता भाजप या सगळ्याला कशाप्रकारे प्रत्युत्तर देणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

कर्जमाफीवरून बहिष्कारनाटय़!

सरकारकडून कोणतेही निर्णय घेताना शिवसेनेच्या मंत्र्यांना डावलले जात असल्याचा आरोप नेहमीच शिवसेनेकडून करण्यात येतो. दोन्ही पक्षांकडून सातत्याने एकमेकांवर कुरघोडी करण्याचाही प्रयत्न होतो. त्यामुळे शिवसेना-भाजपमध्ये कायमच तणावाचे वातावरण राहिले आहे. शेतकरी आंदोलनाला सुरूवात झाल्यापासून शिवसेनेने घेतलेल्या सरकारविरोधी भूमिकेवरून ते स्पष्टही झाले होते. या संपूर्ण लढ्यात आम्ही शेतकऱ्यांच्या पाठिशी आहोत, असे सांगून सेनेने सरकारची कोंडी केली होती. त्यानंतर भाजपनेही पुणतांब्यातील शेतकरी संघटनेशी चर्चा करताना शिवसेनेच्या नेत्यांना खड्यासारखे बाजूला सारले होते. शिवसेनेच्या एकाही मंत्र्याला कर्जमाफीसंदर्भातील निर्णयासाठी किंवा चर्चेसाठी विचारणा झाली नव्हती. त्यानंतर सेनेने आणखी आक्रमक होत मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कारही टाकला होता. मात्र हा बहिष्कार नसून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या परवानगीने सेनेचे मंत्री गैरहजर राहिल्याचे सांगत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बहिष्काराची हवा काढून घेतली. नंतर शिवसेना मंत्रांनीदेखील गुळमुळीत पवित्रा घेतला, तर भाजपच्या मंत्र्यांनी या प्रकारावरून सेनेच्या मंत्र्यांची जोरदार खिल्ली उडविली. मंत्रिमंडळ बैठकीत सेनेचे मंत्री ‘हम साथ साथ है’ म्हणतात, आणि बाहेर मात्र, ‘हम आपके है कौन’ पवित्रा घेतात, अशा शब्दांत एका ज्येष्ठ मंत्र्याने सेनेच्या बहिष्कारास्त्रावर टीका केली होती. यानंतर राज्यातील निरनिराळ्या शेतकरी संघटनांशी कर्जमाफीसह विविध मागण्यांसंदर्भात चर्चा करण्यासाठी सरकारकडून नेमण्यात आलेल्या उच्चाधिकार मंत्रिगटात सेनेच्या दिवाकर रावते यांचा समावेश करण्यात आला होता. मात्र, तेव्हाही सेनेने तळ्यात-मळ्यात अशी भूमिका घेतली होती. या समितीत सामील व्हायचे की नाही याचा निर्णय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून घेतला जाईल. या समितीची कार्यकक्षा आणि अधिकार काय आहेत,समिती कोणाशी चर्चा करणार याची आपल्याला कल्पना नसून सर्व चित्र स्पष्ट झाल्यानंतर आमची भूमिका स्पष्ट करू असे रावते यांनी सांगितले होते.

शिवसेनेने बॅनरवर वाघाऐवजी सरड्याचे चित्र लावावे- धनंजय मुंडे