भाजप व केंद्र सरकारवर टीकेची एकही संधी न सोडणाऱ्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला आहे. नुकताच २८ टक्क्यांचा सर्वांत उच्च जीएसटी दर असलेल्या १७७ वस्तू काढून त्या १८ टक्के जीएसटी गटात समावेश करण्याचा निर्णय जीएसटी परिषदेने घेतला आहे. जीएसटी परिषदेच्या याच निर्णयाचा समाचार उद्धव ठाकरे यांनी ‘सामना’ या सेनेच्या मुखपत्रातील अग्रलेखातून घेतला आहे. पैशांचा पाऊस पाडूनही गुजरात विधानसभा निवडणुकीत मतांची रोपटी उगवणार नाहीत या भयानेच जीएसटीप्रकरणी सरकार झुकल्याची टीका त्यांनी केली. गुजरातच्या जनतेचे अभिनंदन करत ‘गुजरात में फटी तो जीएसटी घटी’ असा टोलाही त्यांनी लगावला.
जीएसटीला सामान्य लोकांचा पाठिंबा असून दलाल व करबुडवे व्यापारीच जीएसटीविरोधात आकांडतांडव करत आहे असे म्हणाऱ्यांनी आता ‘यू टर्न’ घेतला असून लोकक्षोभापुढे सरकार झुकल्याचे त्यांनी म्हटले. कोणत्या विषयात राजकीय लाभ व प्रसिद्धी मिळवण्यास भाजपचे आघाडीवर असल्याची टीका त्यांनी केली.
काय म्हटलंय शिवसेनेने…
– आपणच कौटिल्याचे बाप असून देशाचे व गरिबांचे अर्थशास्त्र फक्त आम्हालाच समजते अशा तोऱ्यात असलेल्यांचे गर्वहरण अखेर जनतेनेच केले.
– लोकांचा आणि व्यापाऱ्यांचा विरोध गेला उडत असे सांगणारे सरकार इतके नरमले कसे?
– गुजरात निवडणुकीत होत असलेला विरोध व कार्यकर्त्यांना केलेली गावबंदी हेच यामागचे कारण
– जीएसटीमधून घेतलेली माघार हा निवडणूकपूर्व भ्रष्टाचार
– हा देश जितका अंबानी-अदानीचा आहे तितकाच छोट्या व्यापाऱ्यांचाही आहे.
– जीएसटीविरोधात उतरलेल्या गुजरातच्या लहान व्यापाऱ्यांनी काट्या खाल्ल्या.