भांडुपमध्ये भाजपचा सेनेला धक्का

जागृती पाटील विजयी; सत्तेसाठी नव्या समीकरणांची शक्यता

संग्रहित छायाचित्र

जागृती पाटील विजयी; सत्तेसाठी नव्या समीकरणांची शक्यता

शिवसेनेच्या एकेकाळच्या भांडुपमधील बालेकिल्ल्याला भाजपने गुरुवारी सुरुंग लावला. भांडुपच्या प्रभाग क्रमांक ११६ मध्ये झालेल्या पालिकेच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या आमदाराच्या पत्नीला धूळ चारून भाजप उमेदवार जागृती पाटील  ४८९२ मताधिक्याने विजयी झाल्या.

काँग्रेसच्या नगरसेविका प्रमिला पाटील यांच्या निधनानंतर भांडुपमधील प्रभाग क्रमांक ११६ मध्ये पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली होती. ही निवडणूक शिवसेना आणि भाजपने प्रतिष्ठेची बनविली होती. पोटनिवडणुकीपूर्वी काही महिने आधी प्रमिला पाटील यांच्या स्नुषा जागृती पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. भाजपने जागृती पाटील यांना उमेदवारी देऊन पोटनिवडणुकीच्या रिंगणात उतरविले होते. तर आमदार अशोक पाटील यांच्या पत्नी आणि पालिका निवडणुकीत पराभूत झालेल्या मीनाक्षी पाटील यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवून शिवसेनेने त्यांना उमेदवारी बहाल केली होती. पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी भाजपचे नेते आणि कार्यकर्ते प्रभाग क्रमांक ११६ मध्ये ठिय्या देऊन बसले होते.

जागृती पाटील यांना ११,२२९, तर मीनाक्षी पाटील यांना ६३३७ मते मिळाली. एकेकाळी भांडुप हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जात होता. मात्र पालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक ११६ मध्ये प्रमिला पाटील यांच्या रूपात शिवसेनेला धक्का बसला.  हा प्रभाग काबीज करण्याची संधी शिवसेनेला पोटनिवडणुकीच्या निमित्ताने आली होती. मात्र पक्षांतर्गत वाद, स्थानिक प्रश्नांमुळे या पोटनिवडणुकीत शिवसेनेला पराभव पत्करावा लागल्याची चर्चा भांडुपमध्ये सुरू आहे.

फेब्रुवारीमध्ये पार पडलेल्या पालिका निवडणुकीत शिवसेनेचे ८४, तर भाजपचे ८२ नगरसेवक निवडून आले होते. माजी उपमहापौर आणि भाजपच्या नगरसेविका शैलजा गिरकर यांचे निधन झाल्यामुळे पालिकेतील भाजपचे संख्याबळ ८१ झाले आहे. आता प्रभाग क्रमांक ११६ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपच्या जागृती पाटील निवडून आल्यामुळे पालिकेतील भाजपचे संख्याबळ ८२ वर कायम राहिले आहे.

लवकरच आमचा महापौर – सोमय्या

भांडुप पोटनिवडणुकीच्या निकालावरुन भाजपने शिवसेनेवर टीका केली असून ‘मोठे दावे करणाऱ्यांचे पोट फाडून हा विजय मिळविला’ असल्याचा टोला मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी लगावला आहे. तर संख्याबळ वाढल्याने महापालिकेत भाजपची सत्ता व महापौर येईल, असा दावा खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे. भाजपने निवडणुकीसाठी नियोजनबध्द पावले टाकली होती. बूथरचना, नेत्यांच्या सभा व पदयात्रांचे नियोजन केले होते. त्यामुळे शिवसेनेला यश मिळू शकले नाही व भाजपची मते वाढली आहेत. शिवसेनेला फटका बसला आहे.आता तरी उद्धव ठाकरे यांचा उद्धटपणा कमी होणार का, असा सवाल सोमय्या यांनी विचारला आहे.

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Shiv sena vs bjp in bhandup