सत्तेत असूनही कामे होत नसल्याची तक्रार; उद्धव ठाकरे मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शिवसेना आमदारांची कामे न झाल्यास किंवा मतदारसंघात निधी न मिळाल्यास सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेण्यासही मागेपुढे पाहणार नाही, असा निर्वाणीचा इशारा शिवसेनेकडून भाजपला दिला जाणार असून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पुढील आठवडय़ात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार आहेत. मुख्यमंत्र्यांनी यात सुधारणा न केल्यास शिवसेनेला आपला मार्ग मोकळा आहे, अशी भूमिका ठाकरे यांनी आमदारांबरोबरच्या बैठकीत व्यक्त केल्याचे सूत्रांनी ‘लोकसत्ता’ ला सांगितले. शिवसेनेच्या राज्यमंत्र्यांना अधिकार नाहीत, भाजपचे मंत्री शिवसेना आमदारांशी नीट वागत व बोलतही नाहीत. त्यामुळे सत्तेत राहण्यात कोणताच अर्थ नसल्याने आता बाहेर पडावे, अशी आक्रमक भूमिका शिवसेना आमदारांनी घेतली आहे.

सरकारमध्ये सामील असूनही शिवसेना आमदारांची कामे होत नसल्याने त्यांनी ठाकरे यांच्याकडे तक्रार केली आहे. शिवसेनेचे मंत्री व प्रतोदांची महत्वाची बैठक ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानी सोमवारी रात्री पार पडली. त्यात शिवसेनेचे मंत्री सुभाष देसाई, दिवाकर रावते, डॉ. दीपक सावंत, विजय शिवतारे यांच्याकडून मिळत असलेल्या वागणुकीबद्दल आमदारांनी तक्रार केली. त्याचबरोबर भाजपचे अनेक मंत्रीही शिवसेना आमदारांशी नीट वागत किंवा बोलत नाहीत. जिल्हा नियोजन व विकास समितीच्या बैठकीत निधी दिला जात नाही. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मंजूर केलेल्या रस्त्याच्या कामांना शिवसेना आमदार-खासदारांच्या मतदारसंघात निधी मिळत नाही. मतदारसंघातील जनतेची सुचविलेली कामेही होत नसतील, तर सत्तेचा उपयोग काय, असा सवाल आमदारांनी या बैठकीत ठाकरे व शिवसेनेच्या मंत्र्यांपुढे केला. इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या भूमीपूजनाच्या वेळी ठाकरे यांना सन्मानपूर्वक निमंत्रण न दिल्याचा मुद्दा काही आमदारांनी मांडला. ठाकरे यांनी मंत्र्यांना वर्तणूक व कामकाजात सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या असून राज्यमंत्र्यांचे अधिकार, निधी व अन्य मुद्दय़ांवर मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी सविस्तर चर्चा करणार आहेत. त्यानंतरही परिस्थितीत सुधारणा न झाल्यास शिवसेना आपला निर्णय घेईल, असे ठाकरे यांनी स्पष्ट केल्याचे समजते.

मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग प्रस्तावाची नोटीस

शिवसेना आमदार संजय पोतनीस यांनी विमानतळ झोपडपट्टीवासियांच्या पुनर्वसनाच्या मुद्दय़ावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात हक्कभंग प्रस्तावाची नोटीस दिली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुनर्वसनाबाबत आश्वासन देऊनही पावले टाकलेली नाहीत, असा मुद्दा त्यात उपस्थित करण्यात आला आहे. शिवसेनेच्या आमदारांना मुख्यमंत्र्यांकडूनही डावलले जाते, अशी तक्रार ठाकरे यांच्याकडेही करण्यात आली आहे. विमानतळ झोपडय़ांबाबत बैठकांसाठी  पोतनीस यांना निमंत्रण दिले जात नाही.

 

 

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv sena warning to bjp
First published on: 26-07-2016 at 02:04 IST